पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडीतील विषारी दारुकांडानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, या प्रकरणातील आरोपी कर्नेलसिंग विरका यांच्या अनधिकृत घरासह दारू अड्ड्यावर गुरुवारी (दि.४) पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाडकामाची कारवाई केली आहे. विषारी दारू विक्रीचे केंद्र ठरलेल्या या ठिकाणावर अखेर महापालिकेने हातोडा चालवला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या वतीने ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या संयुक्त कारवाईमध्ये सुमारे ८७५ चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत झोपडीचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली, उप आयुक्त अण्णा बोदडे व कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई राबविण्यात आली.
कारवाईदरम्यान कार्यकारी अभियंता उमेश मोने, उपअभियंता संदिप पाडवी, महेंद्र देवरे, प्रशांत कोतकर, सुनिल दांगडे, सुनिल हरिदास तसेच कनिष्ठ अभियंते सतीश डांगे, अशोक पाटील, वनिता बवले, योगेश शेवलकर, विशाल नेवाळे, सुरेश लंगोटे, कल्याणी वाघमारे, धनश्री हंडे, ज्योती चांदगुडे, प्रीती बिजवे यांच्यासह बीट निरीक्षक व अतिक्रमण पथक सहभागी होते. तसेच ह क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, २० एमएसएफ जवान यांच्या उपस्थितीत तसेच ०४ ब्रेकर, ०२ गॅस कटर व सुमारे ४० मजुरांच्या सहाय्याने ही कारवाई पार पडली.
महापालिकेने २ जून रोजी संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचे नमूद करत नोटीस बजावली होती. तसेच २४ तासांच्या आत बांधकाम स्वतःहून हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र, सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कर्नेलसिंग विरका यांच्याकडून केवळ घरातील साहित्य हटविण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेने आज प्रत्यक्ष पाडकामाची कारवाई हाती घेतली.




















Join Our Whatsapp Group