पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने चाकण परिसरात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल २५१ गॅस सिलेंडर, गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि एक महिंद्रा बोलेरो टेम्पो असा एकूण ९ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना चाकण मार्केट यार्ड परिसरातील बालाजी गॅस एजन्सीजवळ भरलेल्या घरगुती गॅस सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने छापा टाकून कारवाई केली. यावेळी एजन्सी मालक शुभम प्रवीण परदेशी याच्या सांगण्यावरून गॅस रिफिलिंग करणारे प्रकाश सिद्धान्ना जवलगी आणि तुषार प्रफुल्ल वाळे यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी भरलेल्या सिलेंडरमधून नोजलच्या सहाय्याने इतर सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचे पोलिस तपासात समोर आले.
या बेकायदेशीर प्रकारामुळे मोठा स्फोट किंवा आग लागून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. कारवाईदरम्यान २५१ गॅस सिलेंडर, वजन काटा, नोजलसह गॅस रिफिलिंग साहित्य आणि महिंद्रा बोलेरो टेम्पो जप्त करण्यात आला.

याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८७/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ आणि स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून सुरू आहे.
सदरची कारवाई मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक रावसाहेब मोटे, गोरक्षनाथ बालवडकर, पाडुग देवकाते, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे, पोलीस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश हिंगे, गणेश कोकणे, विशाल गायकवाड, अमर कदम, विनोद वीर, समीर रासकर, मोहसीन अत्तार, अमोल गोरे, ज्ञानेश्वर कौलगे, चंद्रकांत गडदे व गणेश सावंत यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group