पिंपरी (Pclive7.com):- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये व्यापक वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. शहरातील तब्बल ४० ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी भाजयुमोचे शहराध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांनी आगामी महिनाभरात ५ हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प जाहीर केला.

वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि कमी होत चाललेले हरित क्षेत्र यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. ही बाब लक्षात घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहरभर वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली आहे. विविध सार्वजनिक ठिकाणे, मोकळ्या जागा, शैक्षणिक परिसर तसेच नागरिकांच्या सहभागातून अनेक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी बोलताना दिनेश यादव म्हणाले, “वृक्ष हेच जीवनाचे खरे आधार आहेत. पर्यावरणाचे संरक्षण आणि पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. केवळ वृक्ष लावणेच नव्हे तर त्यांचे संगोपन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. भाजयुमोच्या वतीने पुढील एका महिन्यात शहरात ५ हजार वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.”

या उपक्रमात भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, युवक तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वृक्षारोपणासोबतच पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. प्लास्टिकचा वापर कमी करणे, जलसंधारण आणि हरित जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या या उपक्रमामुळे शहरातील हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनासाठी युवकांची भूमिका अधिक प्रभावीपणे पुढे येत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. आगामी काळातही अशा विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भाजयुमोच्या वतीने देण्यात आली.यावेळी शहर अध्यक्ष शत्रुघ्न बाप्पु काटे, संकेत चोंधे, दिनेश काटे, प्रसाद कस्पटे, सुमित घाटे, राजेश डोंगरे,दिपक नागरगोजे, दयानंद बडंगर, नितीन साळी, रोहीत कराळे जांलीदर काटे,आकाश पवार, ओमकार मानकर हे युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group