पिंपरी (Pclive7.com):- अनेकदा समाजातील वंचित घटकांना केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक योजनांचा आपणाला लाभ मिळतो, याची माहितीच नसते. त्यामुळे त्यांना या योजनांचा लाभ देण्यावर पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा भर आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, बांधकाम कामगार कल्याण योजना, संजय गांधी निराधार योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना आदींतून त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील वंचित घटकातील हजारो कुटुंबाना आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची मदत व सहाय्य मिळवून दिले आहे. त्यातून आमदार बनसोडेंचे कार्यालय हे वंचित घटकाचाच अधिक राबता असलेले कार्यालय म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत नोंदणीकृत साडेचारशे बांधकाम स्त्री-पुरुष मजूरांना मंगळवारी (ता.२६) जीवनावश्यक वस्तूंचे कीट (पेटी, सेफ्टी कीट, पाणी बॉटल, चटई, मच्छरदाणी, जेवणाचा डबा,बॅटरी, हातमोजे ,सेफ्टी बुट आदीवस्तू) व या योजनेच्या ओळखपत्रांचे वाटप आमदार बनसोडे यांच्या हस्ते त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. त्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर पाठीवर बिऱ्हाड घेऊन या बांधकाम साइटवरून त्या बांधकाम साइटवर स्थलांतर करणाऱ्या बांधकाम कामगारांना मोठा आधार मिळाला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रजीना फ्रान्सिस, आशा शिंदे उपस्थित होत्या.
बांधकाम कामगार हे कायम स्थलांतरीत होत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी बांधकाम कामगार हा आयुष्यभर पाठीवर बिऱ्हाड घेऊन जगत असतो. आज या बांधकाम साइटवर, तर उद्या त्या बांधकाम साइटवर हा कामगार स्थलांतर करत असतो. हे करत असताना पोटासाठी लागणारे अन्न शिजवण्याची साधने सुद्धा त्याच्याकडे नसतात. ही बाब लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड परिसरातील या कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेंतर्गत आमदार बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाने नोंदणी करून त्यांना नोंदणीकृत बांधकाम मजूर तथा कामगार कार्ड दिले.
तसेच या योजनेतून मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले. या योजनेसह मुख्यमंत्री सहाय्यता निधी, संजय गांधी निराधार योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना आदींतूनही गरजू, गरीब अशा वंचित घटकाला आर्थिक मदत मिळवून दिली जात आहे. प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शासनाच्या अमक्या योजनांमधून तुम्हाला हा लाभ पोहोचू शकतो, याची त्यांना आमदार बनसोडेंचे कार्यालय सांगत आहे. परिणामी शहरातील वंचित, कष्टकरी घटकातील हजारो कुटुबांना आमदार बनसोडेंमुळे केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ मिळतो आहे.