पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेत निर्विवाद बहुमत मिळवून देखील एकही महापालिकेची सर्वसाधारण सभा सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्यांना व्यवस्थितपणे चालवता आली नाही. त्यामुळेच अखेर महापालिकेतील बिघडलेली घडी बसविण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सहयोगी अपक्ष आमदार महेश लांडगे यांनाच मैदानात उतरावे लागले.
पूर्ण बहुमत असताना देखील गेल्या पाच महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपला सभागृहात आपली छाप पाडता आली नाही. त्यामुळे आज महापालिका सभेच्या पूर्वनियोजनाकरिता आयोजित पार्टी मिटींगला इतिहासात पहिल्यांदाच आमदारांनी हजेरी लावत सदस्यांना उपदेशाचे डोस दिले. पक्षनेते एकनाथ पवार यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला महापौर नितीन काळजे, स्थायी सभापती सीमा सावळे, उपमहापौर शैलजा मोरे तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.
फेब्रुवारी महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक झाली. गेल्या १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. भाजपला अनपेक्षितपणे घवघवीत यश मिळाले.
भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यामुळेच सत्ता परिवर्तन झाले. महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला. नव्या पर्वाची सुरूवात झाली. मात्र एकहाती सत्ता मिळवून देखील गेल्या ६ महिन्यात समाधानकारक कारभार भाजपला करता येत नसल्याची ओरड विरोधक करत आहेत. निर्विवाद बहुमत असून एकही महापालिकेची सभा सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्यांना व्यवस्थितपणे चालवता आलेली नाही. केवळ वादविवाद, आरोप-प्रत्यारोप यांचेच दर्शन सभागृहात होत आहे. सभागृहात महापौर कोणाच्यातरी रिमोटवर चालतात, विरोधकांना बोलूच दिले जात नाही, स्थायी सभापतींचा प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप, विषयांना उपसुचनांचा सपाटा सुरूच असल्याची ओरड विरोधी पक्षाकडून होत आहे.
दरम्यान, पारदर्शकतेचा ‘डंका’ वाजवत सत्तेत आलेल्या भाजपाची प्रतिमा जनमाणसात मलिन होत असल्याचे सत्ताधारी नगरसेवक सांगत आहेत. तर काही नगरसेवक सभागृहात नेमकं काय चालतयं तेच कळत नसल्याचे सांगत आहेत. सत्ता मिळवूनही भाजप कारभार चालवण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळेच अखेर भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सहयोगी अपक्ष आमदार महेश लांडगे यांनाच मैदानात उतरावे लागले आहे.