पिंपरी (प्रतिनिधी):- हिंजवडी येथील एका बांधकाम साईटवर रात्री दहाच्या सुमारास लोखंडी जिना कोसळल्याने एका मजूराचा मृत्यू झाला आहे. तर ३५ मजूर जखमी असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी हिंजवडी परिसरातील वेगवेगळ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
हिंजवडी फेज ३ येथील बांधकाम साईटवर मजुरांना राहण्यासाठी दोन मजली पत्र्याच्या खोल्या बनवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तब्बल एक हजार मजूर राहण्यास आहेत. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लोखंडी जिना बनवण्यात आला आहे. रात्री दहाच्या सुमारास मजुरांच्या दोन गटात भांडणे सुरू होती. ती पाहण्यासाठी सर्व मजूर लोखंडी जिन्यावर उभे राहिले होते. मजुरांच्या जास्तीच्या वजनामुळे लोखंडी जिना खाली कोसळून अपघात झाला. त्यावेळी जिन्यावर उभे असलेले मजूर खाली कोसळून जखमी झाले आहेत.
हिंजवडीतील या अपघातामुळे बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.