भोसरी (Pclive7.com):- ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोष, ढोल-ताशा व बँड पथकाचा गजर, आकर्षक फुलांनी सजविलेले रथ, विद्युत दिव्यांचा झगमगाट, गुलाल व भंडाऱ्याची उधळण अशा उत्साही व भावपूर्ण वातावरणात भोसरीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला.
भोसरीतील सार्वजनिक गणेश मंडळांतील गणेश मूर्तीचे विसर्जन दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी केले जाते. दुपारपासूनच भोसरीत गणेश मूर्तीच्या विसर्जनास सुरवात झाली. येथील मुख्य चौकात महपालिकेच्यावतीने सर्व गणेश मंडळांचा श्रीफळ व हार देऊन सत्कार व स्वागत करण्यात आला होता. दुपारी २.४५ वाजता कानिफनाथ मित्र मंडळाच्या मिरवणुकीचे स्वागत ई क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने करण्यात आले.
भोसरीतील मुख्य विसर्जन मिरवणूक सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू झाली. बापुजीबुवा चौकापासून मुख्य विसर्जन मिरवणुकीस सुरवात झाली. परिसरातील सर्व मानाचे गणेशोत्सव मंडळे मिरवणुकीत सहभागी झाले होते. बापूजीबुवा चौकापासून मिरवणूक भैरवनाथ मंदिरापासून पुढे जात मुख्य चौकात येत होती. पीएमटी चौकात आकर्षक सजविलेले रथ तसेच ढोल ताशाचा निनादाचा आनंद लुटण्यासाठी भोसरीकरांनी मोठी गर्दी केली होती.
आळंदी रोड येथील श्री गणेश तरुण मंडळाने बालाजी रथामधून गणरायांची विसर्जन मिरवणूक काढली. नरवीर तानाजी मंडळाने आकर्षक रथातून मिरवणूक काढली. फुगे माने तालीम मित्र मंडळाने गणरायाला निरोप देण्यासाठी फुलाने सजविलेला रामकृष्णहरी मठ रथ तयार केला होता.
विसर्जन मिरवणुकीत पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळाने आकर्षक बालाजी रथावर विद्युत रोषणाई करीत मिरवणूक काढली. लांडगे लिंबाची तालीम मंडळाने ‘मयूर रथा’मध्ये ‘श्रीं’ची मिरवणूक काढली. श्रीराम मित्र मंडळाने ढोल-ताशांच्या गजरात आकर्षक ‘मयूर रथावरून’ ‘श्री’ची विसर्जन मिरवणूक काढली होती. लांडेवाडी येथील नव महाराष्ट्र तरुण मंडळाने आकर्षक फुलांनी सजवलेल्या ‘मयूर रथावरून गणपतीची मिरवणूक काढली.