पिंपरी (Pclive7.com):- स्वराज्यभूमी कोकण महोत्सवात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचे वक्तव्य केले होते. यावर शिवप्रेमींकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील निगडी-यमुनानगरचे विभागप्रमुख सतीश मरळ यांनी लाड यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. तसेच लाड यांना इयत्ता चौथीचे इतिहासाचे पुस्तक पोस्टाद्वारे भेट पाठविले आहे. प्रसाद लाड यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोठे झाला याची माहिती नसने यासारखे दुर्दैव दुसरे असू शकत नाही, अशा शब्दांत मरळ यांनी लाड यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

कोकण महोत्सवात बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले. रायगडावर स्वराज्याची शपथ घेतली, असे प्रसाद लाड यांनी म्हटले होते. यावरून त्यांच्यावर चौफेर टीका सुरु झाली. त्यामुळे लाड यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने वादग्रस्त विधाने करण्यात येत आहे. याची सुरुवात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली होती. त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचे अजब विधान केलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधत भाजपावर टीका केली होती. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असा खोचक टोला राष्ट्रवादीने भाजपला हाणला होता.
प्रसाद लाड यांची दिलगिरी..
दरम्यान, शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं अनावधानाने माझ्याकडून बोलले गेले. मात्र, माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादव यांनी चूक दुरुस्त करत महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाल्याचे सांगितले. माझ्या विधानाने जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे प्रसाद लाड म्हणाले.






















Join Our Whatsapp Group