पिंपरी (Pclive7.com):- राजपूत समाज संघटना पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने पुणे जिल्ह्यात पद्मावती चित्रपटाचे एकही पोस्टर अथवा चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना रविवार दि.२९ रोजी निवेदन देऊन चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती राजपूत महामोर्चा पिंपरी चिंचवड शहर प्रमुख नीता परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राजपूत समाज संघटना पिंपरी चिंचवड अध्यक्ष शिवकुमार बैस, युवा राजपूत प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर गिरासे, आबा राजपूत, श्रीराम सिंग परदेशी, भरत देशमुख, दीप्ती राजपूत, अनिल सिंग बैस, जगदीश सिंग भानुजा, किरण ठाकूर, धीरज ठाकूर, सचिन राजपूत व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आगामी चित्रपट पद्मावतीच्या प्रदर्शनासाठी राजपूत समाज संघटनेच्या वतीने विरोध दर्शविण्यात येत आहे. राजपूत समाजाच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली असून सरकारी शिष्टमंडळाने राजपूत समाजाला चित्रपट दाखविल्याशिवाय महाराष्ट्रात प्रदर्शित करणार नसल्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
राजपूत समाजात पद्मिनी हे देवीचे स्वरूप आहे. तिने आपली अब्रू वाचविण्यासाठी आपल्या १६ हजार दासी आणि राण्यांसोबत जोहर (सती) केला होता. अशा राणीचा अपमान चित्रपटाच्या माध्यमातून करण्याचा लाजिरवाणा प्रयत्न संजय लीला भन्साळी यांनी केला आहे. टीआरपीसाठी इतिहासात हस्तक्षेप केला जात आहे. यापूर्वी देखील जोधा अकबर, बाजीराव मस्तानी अशा चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित केल्यास भन्साळी यांना पुढील परिणामास सामोरे जावे लागेल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.