चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असल्याची माहिती मिळत आहे. अज्ञातांनी हा हल्ला केला असून भोसले यात जखमी झाले आहेत. त्यांना बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजत आहे. ही घटना डांगे चौक गणेशनगर येथे आज (दि.२२) सायंकाळी घडली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा प्रचार शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन करत होते. त्याचवेळी तिथे आलेल्या काही जणांनी सचिन भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला. त्यात भोसले यांच्या हाताला दुखापत झाली आहे. राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याच्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. दोघांनाही उपचारासाठी बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.