पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपूलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. याबाबत महापालिकेच्या बी.आर.टी.एस विभागामार्फत कामाचे आदेश जारी करण्यात आले आहेत अशी माहिती माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली आहे.
याविषयी माहिती देताना संदीप वाघेरे म्हणाले कि, १९/०५/२०१७ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांना मी स्वतः पहिले पत्र देऊन याविषयाचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. २०/०९/२०१७ रोजी पुन्हा दुसरे पत्र देऊन पाठपुरावा केला. रेल्वे उड्डानपुलाचे काम तत्काळ मार्गी लागावे यासाठी स्वत: दिल्ली येथे जाऊन तत्कालीन रक्षा मंत्री निर्मलाजी सीतारामन यांची प्रत्यक्ष भेट घेतली. कमांडट, स्टेशन हेद्क्वार्टर, खडकी यांनी दिनांक २२/१०/२०१३ चे पत्रान्वये महापालिकेस संरक्षण विभागाने मंजूर केलेल्या रस्त्यांमधील पिंपरी डेअरी फार्म रस्ता यासाठी र.रु. २,८६,८७,६५१/- (८०८१.०० चौ.मी. क्षेत्रासाठी) इतकी रक्कम संरक्षण विभागाकडे जमा करनेबाबत कळविले होते. त्यानुसार महापालिकेने संरक्षण विभागाकडे रक्कम जमा केलेली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेने संरक्षण विभागाचे सूचनेनुसार ११/०२/२०१५ पत्रान्वये (अ.नं. १५ – पिंपरी डेअरी फार्म ) नवीन रस्ता आखणी प्रकरण संरक्षण विभागास सादर केले.
नवीन रस्त्याचे आखणी प्रकरणानुसार वाढीव २७१७ चौ.मी.क्षेत्रासाठी संरक्षण विभागाने मंजूर केलेल्या ३५५० प्रती चौ.मी.या जमिन दरानुसार वाढीव रक्कम महापालिका संरक्षण विभागास देण्यास तयार असून नवीन रस्ता आखणीनुसार महापालिकेने रेल्वे वरील उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. महापालिकेने संरक्षण विभागास अदा केलेल्या रक्कमेच्या क्षेत्रफळा इतक्या क्षेत्रावर उड्डाणपुलाचे काम सुरू करणेस संरक्षण विभागाने त्वरित मंजूरी द्यावी अशी मागणी श्रीमती निर्मलाजी सीतारामन यांचेकडे केली होती. यानंतर डिफेन्स इस्टेट ऑफिस पुणे व मिलेट्री डेअरी फार्मचे ऑफिस इन्चार्ज लेफ्टनन कर्नल ग्यान प्रकाश यांना भेटून उड्डाणपूलाच्या कामास परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेल्वे उड्डानपुलाचे काम मार्गी लागण्यात यश आले आहे असे संदीप वाघेरे यांनी सांगितले.
सदर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यास पिंपरीगाव, पिंपळेसौदागर, रहाटणी, काळेवाडी परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. महापालिकेच्या वतीने रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचे आदेश जारी केल्यामुळे पिंपरी येथील भुयारी मार्ग साई चौक, शगुन चौक पुलावरील वाहतुक कोंडी कमी होईल व पुणे मुंबई महामार्गाकडे येजा करणार्या नागरिकांसाठी सोयीचे होईल असे त्यांनी म्हटले आहे.