पिंपरी (Pclive7.com):- यमुनानगर येथील स्व. मीनाताई ठाकरे जलतरण तलावाचे काम निकृष्ट करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे चिखले यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. यावेळी मनोज लांडगे, निलेश पवार, जय सकट, रोहिदास शिवनेकर हे उपस्थित होते.

सचिन चिखले यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्र.१३ मधील यमुनानगर निगडी येथील स्व. मीनाताई ठाकरे जलतरण तलावाचे काम नोव्हेंबर २०२२ मध्ये पूर्ण होऊन तो नागरिकांना वापरासाठी खुला करण्यात आला होता. तथापि त्या तलावाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे केले आहे. त्यामुळे या जलतरण तलावात नागरिक तसेच मुले पोहण्यासाठी येत होते, त्यांना बऱ्याच गंभीर प्रकारच्या इजा सुद्धा झालेल्या आहेत.

कोविड काळात सलग २ वर्षे जलतरण तलाव बंद होता. त्यामुळे सदर परिसरातील नागरिक व विद्यार्थी ह्यांना ह्या जलतरण तलावाचा वापर करता आला नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ दरम्यान या तलावाचे काम करण्यात आले व नागरिकांसाठी हा तलाव खुला करण्यात आला. परिसरातील नागरिकांनी पुढील काळासाठी बुकिंग सुद्धा करून ठेवले होते. तसेच विद्यार्थ्यांचे पोहण्याचे क्लासेस सुद्धा चालू झाले. परंतु निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्यामुळे हा तलाव बंद करावा लागला व याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागला.
ऐन उन्हाळ्याच्या एप्रिल-मे च्या काळात जलतरण तलाव पुन्हा बंद करावा लागला. अजूनही तो तलाव बंद असून ठेकेदाराकडून पुढील कामासाठी चालढकल करण्यात येत आहे. तरी संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करून त्याला महापालिकेच्या काळ्या यादीत समाविष्ट करावे. तसेच हे काम दुसऱ्या एखाद्या चांगल्या ठेकेदारास देऊन लवकरात लवकर हा जलतरण तलाव नागरिकांसाठी वापरास उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी सचिन चिखले यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group