पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवर नवीन बांधकाम चालु असलेल्या ठिकाणी झालेल्या भुस्खलनामुळे जलवाहिनी तुटली. पाणीपुरवठा विभागाने युद्ध पातळीवर या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी सतर्क रहावे अशा सूचना देखील महापालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेच्या नियंत्रण कक्षास माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. दि २० जुलै रोजी पहाटे पिंपळे सौदागर परिसरातील एका बांधकाम चालू असलेल्या साइटवर भुस्खलन होवुन रस्ता खचला असल्याची माहिती महापालिकेला मिळाली. या भागात असलेली जलवाहिनी आणि जलनि:सारणवाहिनी यामुळे बाधित झाली. सूचना मिळाल्यानंतर महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी भेट दिल्यानंतर सहशहर अभियंता डॉ.ज्ञानदेव जुंधारे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कुणाल आयकॉन रोडवर सुखवानी रामचंदानी एलएलपी बिल्डरच्या व्यावसायिक आणि निवासी इमारतीची ही जागा आहे. तळघरासाठी खोदकाम केल्यामुळे ५० मीटर लांबीचा आणि साधारणपणे तीन मीटर रुंदीचा रस्ता कोसळला आहे. वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री गोकुळे यांच्या समवेत या भागाची संयुक्त पाहणी केली आहे. या मार्गावरील वाहतुकीला सद्यस्थितीत कोणतीही अडचण नसून वाहतूक सुरळीत सुरू आहे. संबंधित बिल्डरला खचलेला भूभाग भरण्यास आणि त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या ठिकाणी बॅरीकेटींग करण्यात आले आहे. आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी परिस्थितीची माहिती घेतली असून बाधित झालेला पाणीपुरवठा वेळेत सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता अजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागातर्फे जलवाहिनी दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण होईल. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.