पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर, रहाटणी प्रभागातील महापालिकेच्या अण्णासाहेब मगर विद्यालयातील प्रलंबित प्रश्नांबाबत माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी लक्ष वेधले आहे. काटे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना लेखी निवेदन दिले आहे.
शत्रुघ्न काटे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर रहाटणीमध्ये महापालिकेचे अण्णासाहेब मगर प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय आहे. सदर विद्यालयात बालवाडी (१५०), प्राथमिक (५००) आणि माध्यमिक (१२००) या तिन्ही माध्यमात सदर शाळेच्या पटावर एकूण १८५० विद्यार्थी आहेत. अशी भरीव पटसंख्या असतांना देखील शाळेचे कामकाज फार तडजोडीने करण्याचे आव्हान शाळा प्रशासनासमोर आहे.
अण्णासाहेब मगर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवणार्या शिक्षकांचा अपुरा स्टाफ असून अपेक्षित एकूण शिक्षकापैकी ३ शिक्षक कमी आहेत. अश्या अवस्थेत विद्यार्थ्यांना शिकवण्याची अतिरिक्त जबाबदारी उपलब्ध शिक्षकांवर पडत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या जास्त संख्येमुळे उपलब्ध वर्ग खोलीची संख्या खूप कमी असून ५ वर्गांना बसण्यास जागा उपलब्ध नाही. अशी परिस्थिती असताना सदर शाळेसंदर्भात एक नवीन बाब शत्रुघ्न काटे यांच्या निदर्शनास आली आहे. दिनांक १ ऑगस्ट २०२३ पासून माध्यमिक शाळेचे वर्ग देखील सकाळच्या आणि दुपारच्या अश्या दोन्ही सत्रात भरवण्यात येणार आहे.
या बाबतीत शत्रुघ्न काटे यांनी महापालिका प्रशासनाला जाब विचारला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “सकाळच्या सत्रात भरणारे बालवाडी आणि प्राथमिक शाळेच्या वर्गांनाच वर्ग (खोल्या) पुरेसे नाहीत. तर सकाळच्या सत्रात माध्यमिक शाळेचे वर्ग कुठे आणि कसे भरवणार ?” अश्या निर्णयामुळे बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक या तिन्ही सत्रात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होईल. तसेच शाळा प्रशासनावर याचा अतिरिक्त भार पडून शाळेच्या कामकाजावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
शत्रुघ्न काटे यांनी आयुक्तांना म्हटले आहे की, दिनांक १ ऑगस्ट २०२३ पासून माध्यमिक शाळेचे वर्ग सकाळच्या सत्रात भरवण्याच्या निर्णयास पुर्णपणे स्थगिती द्यावी. आणि माध्यमिक शाळेचे वर्ग हे दुपारच्याच सत्रात भरवण्यात यावे. तसेच प्राथमिक शाळेत कमी पडत असलेल्या शिक्षकांची भरती तातडीने करण्यात यावेत.