पिंपरी (Pclive7.com):- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९ च्या नोटिसा दिल्या आहेत. तर, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या मोहननगर येथील निवासस्थानी सकाळी सहा वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. भापकर यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
केंद्र सरकार बहुराज्यीय सहकारी संस्थांना (मल्टीस्टेट) त्यांच्या व्यवसायात सुलभता वाढविण्यासाठी डिजिटलवर भर देत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्राने विकसित केलेल्या बहुउद्देशीय सहकारी संस्था पोर्टल एकात्मिक पोर्टलचे उद्घाटन सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज रविवारी दुपारी बारा वाजता चिंचवड येथे होणार आहे.
पोलिसांनी खबरदारी म्हणून विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९ च्या नोटिसा दिल्या आहेत. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांना नोटिसा दिल्या आहेत. तर, भापकर यांच्या निवासस्थानाबाहेर सकाळपासून पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. भापकर नजरकैदेत आहेत. पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव जमवणे, पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास मनाई आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. कोणत्याही प्रकारचे निवेदन देणार नाहीत. काळे झेंडे दाखविणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कायम सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नोटीसीचा भंग होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी, असे नोटिशीत म्हटले आहे.