परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवा, हल्लेखोरांवर कडक कारवाई करा – पांडाभाऊ साने
पिंपरी (Pclive7.com):- चिखली मोरेवस्ती परिसरात असंख्य नोकरदार व कामगारवर्ग वास्तव्यास आहेत. रात्री-अपरात्री हे कामगार कामावरून घरी असताना त्यांच्यावर लुटीसाठी दबाव धरून बसलेले हल्लेखोर अचानक हल्ला करतात. बुधवारी (दि. ७) रोजी रात्रीच्या सुमारास साने चौक परिसरात अशाच काही लुटारू गुंडानी कामगारांवर कोयत्याने वार करीत त्यांना गंभीर जखमी केले. त्या कामगारांचे पैसे, मोबाईल, व इतर साहित्य हिसकावून तेथून पळून गेले. त्यामुळे साने चौक परिसरात दहशत पसरली असून नागरिक भयभीत आहेत.
चिखलीतील भाजपचे युवा नेते पांडाभाऊ साने यांनी या प्रकाराची गंभीरपणे दाखल घेत थेट चिखली पोलीस ठाणे गाठत पोलीस अधिकाऱ्यांपुढे कैफियत मांडली. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेची धिंड निघत असताना पोलीस शांत कसे? असा सवाल करीत ताबडतोब हल्लेखोरांना अटक करून त्यांना कडक शासन करण्याची मागणी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत चिखली मोरे वस्ती परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिशय विकृत प्रवृत्तीच्या लुटारू गुंडानी कोयत्याचा धाक दाखवून मोरेवस्ती परिसरात दहशत माजवली आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच रात्री घडलेल्या गंभीर प्रकरणाचा ताबडतोब छडा लावण्यासाठी आणि साने चौक परिसरात रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यासाठी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
– पांडाभाऊ साने, युवा नेते भाजपा.