पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा आणि विधानसभा महायुतीतर्फे लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे, असे वक्तव्य देखील अजित पवार यांनी केले आहे. ते चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. अजित पवार हे आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पिंपरी- चिंचवड शहरात आले होते.
यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मयूर कलाटे, शाम लांडे, प्रशांत शितोळे, राहुल भोसले, अतुल शितोळे, जगदीश शेट्टी, तानाजी खाडे, सतीश दरेकर, फझल शेख, विशाल वाकडकर, विशाल काळभोर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा आपण महायुतीतर्फे लढणार आहोत. आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे. महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच काय? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण येईल. या पूर्वी काँग्रेस पक्षासोबत आघाडी होती ती परिस्थिती राहील, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्या-त्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, शहरातील नेत्यांनी आणि नागरिकांनी ठरवायचं की युती करायची की एकट्याच्या ताकदीवर लढायचं. निवडून येणार असाल अशी खात्री असेल तर तुम्ही युती करू नका. मतांची विभागणी न होता युती केली पाहिजे, तर युती करा, असे अजित पवार म्हणाले.