पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा शरद पवार गट झाला ‘सक्रिय’ झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज शहरातील गणेश मंडळांना भेटी देणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची तुषार कामठे या तरुण चेहऱ्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यांच्या या निवडीनंतर शहराच्या राजकारणात एक नव चैतन्य निर्माण झाले आहे. आता शहर नक्की कुणाचे याची चक्रे जोरात फिरू लागली आहेत. नुकतेच आमदार रोहित पवार यांनी बाईक रॅली आणि पत्रकार परिषद घेउन पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालणार असल्याचा सूचक इशारा विरोधकांना दिला आहे. त्यातच आज (दि.२३) शनिवार हा दिवस रोहित पवार यांनी खास पिंपरी चिंचवडच्या गणेश मंडळाना भेटी देण्यासाठी काढला आहे. आज दुपारपासून ते पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील गणेश मंडळाना भेट देतील. यावेळी ते गणेश मंडळासोबतच काही आजी माजी नगरसेवक आणि जेष्ठ नेत्यांच्या आणि गृहनिर्माण संस्थाच्या भेटीगाठी सुद्धा घेणार आहेत.
गणरायाला लोकांच्या समस्या सांगून त्या सोडवण्याची आम्हाला शक्ती-युक्ती आणि आशीर्वाद दे, हे हितगुज करण्यासाठी आमदार रोहित पवार येणार असल्याचे अध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले आहे. शहराच्या राजकरणात रोहित पवार यांच्या एंट्रीने येणाऱ्या काळात पिंपरी चिंचवडकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागणार यात काही शंका नाही.