पिंपरी (Pclive7.com):- चिखली, जाधववाडीत डेंग्यूसदृश आजाराने पाच आणि दहा वर्षीय अशा दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. दोघेही उपचारासाठी पुण्यात दाखल होते. त्यांचे डेंग्यू चाचणी अहवाल नकारात्मक आहेत. मात्र, लक्षणे डेंग्यूची होती.
गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या तीन महिन्यात शंभर जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. जुलै महिन्यात ३६ तर ऑगस्टमध्ये ४० बाधित रुग्ण आढळले होते. डेंग्यूशिवाय चिकुनगुनिया, हिवताप यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भावही शहरात वाढत आहे.
जाधववाडीतील पाच वर्षीय बालकाला डेंग्यूसदृश आजारामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान १९ सप्टेंबर रोजी बालकाचा मृत्यू झाला. तर, जाधववाडीतीलच १० वर्षीय मुलीला डेंग्यूसदृश आजारामुळे ४ सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.
चिखली जाधववाडीतील मृत्यू झालेल्या दोन्ही बालकांना डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे होती. त्यांचे डेंग्यू चाचणी अहवाल नकारात्मक आहेत. दोघेही उपचारासाठी पुण्यात होते. त्यांच्या वैद्यकिय अहवालाद्वारे इतर माहिती घेतली जात आहे अशी मागणी महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.