पिंपरी (Pclive7.com):- आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात अंमली पदार्थांच्या विरोधात हिंजवडी पोलिसांनी मोठी कारवाई करत अफूच्या नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बोंडांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल १० किलो अफूच्या बोंडांचा चुरा आणि बोंड जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे आयटी पार्कमध्ये पुन्हा एकदा अंमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.

हिंजवडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पुष्पेन्द्र सिंग किरपाराम (रा. राजस्थान) याला ताब्यात घेतले. पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी अफूच्या बोंडांची विक्री करण्यासाठी हिंजवडी परिसरात आला होता. कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे १० किलो वजनाचा अफूच्या बोंडांचा चुरा आणि बोंड आढळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अफूच्या बोंडांचा चुरा सिगारेटमध्ये तसेच चहा किंवा कॉफीमध्ये मिसळून सेवन केला जातो. यामुळे नशा निर्माण होत असल्याने या पदार्थाची काही ठिकाणी बेकायदेशीर मागणी असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, आरोपीवर यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का, त्याचे इतर राज्यांतील अंमली पदार्थ तस्करांशी संबंध आहेत का, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
आयटी कंपन्यांचे प्रमुख केंद्र असलेल्या हिंजवडी परिसरात अंमली पदार्थांची विक्री करण्याचा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी मोठे यश मिळवले असले, तरी या प्रकरणामागील संपूर्ण साखळी उघड करणे आणि संबंधितांवर कारवाई करणे हे आता पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.




















Join Our Whatsapp Group