पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडीतील थिंकटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला रातोरात टाळे ठोकून शेकडो आयटी अभियंत्यांना बेरोजगार करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अखेर अटक करण्यात आली आहे. कंपनीचे सीईओ हर्षल ठाकरे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या, तरी संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल ठाकरे यांनी सुमारे 700 आयटी अभियंत्यांकडून लॅपटॉप डिपॉझिटच्या नावाखाली प्रत्येकी 15 हजार रुपये घेतले होते. याशिवाय जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांचे पगारही थकवण्यात आले होते. अचानक कंपनी बंद करून व्यवस्थापन फरार झाल्याने शेकडो कर्मचारी आर्थिक संकटात सापडले.
या प्रकरणी पीडित आयटी अभियंत्यांनी 21 मे रोजी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दिली होती. मात्र, गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. माध्यमांनी हा विषय उचलून धरल्यानंतर पोलिसांनी “आरोपीचा शोध सुरू आहे” असे स्पष्टीकरण दिले. परंतु आरोपीचा मोबाईल सुरू असूनही त्याला अटकेपासून संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही समोर आला.

त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी कंपनीचे सीईओ हर्षल ठाकरे, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट हेड ध्रुवील पारेख, एचआर प्रमुख सौम्या सिंग तसेच इतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, फिर्यादीमध्ये तक्रारदार आयटी अभियंते उशिरा तक्रार देण्यासाठी आले असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी पोलिसांनी पीडितांवरच अप्रत्यक्षपणे ठपका ठेवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे, पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात केवळ 11 लाख 25 हजार रुपयांच्या फसवणुकीचा उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात 700 कर्मचाऱ्यांकडून जमा केलेले डिपॉझिट आणि अनेक महिन्यांचे थकीत वेतन विचारात घेतल्यास फसवणुकीची रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुन्ह्याची तीव्रता कमी दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय बळावला आहे.
दरम्यान, आरोपी हर्षल ठाकरे याला अटक झाल्यानंतर आता पोलिसांनी सखोल आणि निष्पक्ष तपास करून संपूर्ण आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणावा, तसेच फसवणुकीमुळे बेरोजगार झालेल्या शेकडो आयटी अभियंत्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पीडित कर्मचाऱ्यांकडून होत आहे. या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरेही तपासातून स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




















Join Our Whatsapp Group