१ लाख वृक्षारोपण, योग दिन आणि मोदी सरकारच्या योजनांच्या प्रचाराची रणनीती निश्चित
पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवड, पुणे उत्तर आणि मावळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची विभागीय आढावा बैठक बुधवारी उत्साहात पार पडली. आगामी संघटनात्मक उपक्रम, मोदी सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा प्रचार आणि पक्ष विस्तारासाठीची रणनीती या बैठकीत निश्चित करण्यात आली.

बैठकीला भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा विभाग समन्वयक निरंजन डावखरे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, विभाग सहसंयोजक विक्रम देशमुख, अभियान प्रदेश सहसंयोजक विक्रम पाचपुते आणि जिल्हा प्रभारी भरत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि पुणे उत्तर (मावळ) जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली.
‘मोदी सरकारची यशस्वी वर्षे : विश्वास, विकास आणि जनकल्याण’ या राज्यव्यापी अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या चार महत्त्वाच्या कार्यक्रमांचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिली.
चार प्रमुख अभियानांवर भर
१) १ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात एकाच दिवशी किमान १५ हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले असून, संपूर्ण आठवडाभरात १ लाखांहून अधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार करण्यात आला.
२) आंतरराष्ट्रीय योग दिनाचे भव्य आयोजन २१ जून रोजी शहरातील विविध योग संस्था, पतंजली परिवार आणि योगप्रेमींच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर योग दिन साजरा करण्यात येणार आहे.
३) आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त कार्यक्रम २५ जून रोजी आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त मंडल स्तरावर विशेष व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. तसेच त्या काळात तुरुंगवास भोगलेल्या मिसाबंदी कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
४) मोदी सरकारच्या योजनांची जनजागृती केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांवर आधारित प्रदर्शने, चित्रकला स्पर्धा आणि लाभार्थ्यांच्या अनुभवांचे व्हिडीओ तयार करून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

SIR नोंदणीत ४० टक्के काम पूर्ण
पक्ष संघटनेच्या SIR नोंदणी अभियानाचा आढावा घेताना शत्रुघ्न काटे यांनी भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांत आतापर्यंत सुमारे ४० टक्के नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती दिली. पुढील १५ दिवसांत हा आकडा ५० टक्क्यांहून अधिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड भाजप राज्यात अग्रेसर – निरंजन डावखरे
बैठकीत मार्गदर्शन करताना प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे म्हणाले, “राष्ट्रीय किंवा प्रादेशिक स्तरावरील कोणताही उपक्रम असो, तो प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यात पिंपरी-चिंचवड शहर भाजप नेहमीच राज्यात अग्रेसर राहिले आहे. आगामी कार्यक्रमांचे नियोजन आणि SIR नोंदणीचा वेग पाहता शहर संघटनेने पुन्हा एकदा आपले अव्वल स्थान सिद्ध केले आहे.”
या बैठकीला आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, माजी खासदार अमर साबळे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार अश्विनी जगताप, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र व मावळ परिसरातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंडल अध्यक्ष आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन योगेश बाचलं यांनी केले, तर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.




















Join Our Whatsapp Group