पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात विषारी दारू प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने दारू पिण्यास विरोध केल्याच्या रागातून एका व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मृत व्यक्तीचे नाव अरविंद लक्ष्मण लोहार असे आहे. याबाबत चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद यांना दारूचे व्यसन होते. दारू पिण्यावरून त्यांचे पत्नीशी वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशीही पत्नीने दारू पिण्यास मनाई केल्याने दोघांमध्ये वाद झाला.

या वादाच्या रागातून अरविंद यांनी घरात ठेवलेले ढेकूण मारण्यासाठी वापरण्यात येणारे विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने पत्नीने त्यांना तातडीने महापालिकेच्या थेरगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.




















Join Our Whatsapp Group