पिंपरी (Pclive7.com):- मुलींसाठी आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत पीसीसीओई मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. पीसीसीओईआरचा संघ उपविजेता ठरला.
पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (१० ऑक्टोबर) आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल मुलींची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय (पीसीसीओईआर), रावेत संघाला २२/१९ गुण फरकाने नमऊन विजय संपादन केला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत पीसीसीओई संघाने एआयटी, दिघीला तर पीसीसीओईआर संघाने आयसीसीएस, ताथवडे संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील १३ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदवला. पीसीसीओईच्या आर्या जगताप, संपदा सावंत, नाईशा बाराहाते आणि पीसीसीओईआर संघातील प्रीति हंकारे, श्रेया सिंघ, पूर्वा भिरुड या खेळाडूंची आंतर विभागीय स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघात निवड झाली.
विजयी पीसीसीओई संघातील खेळाडू, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे तसेच उपविजयी पीसीसीओईआरचे खेळाडू, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. मिलिंद थोरात यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिश तिवारी यांनी अभिनंदन केले.