पिंपरी (Pclive7.com):- मुलांना शालेय वयातच खेळाची आवड निर्माण करण्यात पालक आणि शिक्षकांची जबाबदारी महत्वाची आहे. मन प्रसन्न ठेवण्यासाठी शारीरिक आरोग्य महत्त्वाचे असते. शिक्षणाबरोबर खेळाला महत्व दिले पाहिजे, भविष्यात येणाऱ्या आव्हांनाना सामोरे जाण्याचे सामर्थ्य खेळातून मिळते. आताच्या काळात मुले मोबाईल, इंटरनेटचा वापर अधिक करतात. कार्टून्स, गेम, मोबाईलवर बुद्धिबळ, क्रिकेट, फुटबॉल खेळत बसतात. मुलं मैदानावर आली पाहिजेत. मला जमत नाही ही भूमिका सोडा, जमलं पाहिजे ही भावना ठेवा. लहान मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. बालवयापासुनच विविध खेळात समरस झाले पाहिजे असे मत प्रेरणा शिक्षण संस्थेचे मानद सचिव कांतीलाल गुजर यांनी व्यक्त केले.
ते प्रेरणा प्राथमिक, माध्यमिक व तुकाराम गुजर कनिष्ठ महाविद्यालय शाळेत आयोजित क्रीडा स्पर्धा उदघाटन समारंभात ते बोलत होते.
याप्रसंगी श्री.शिवछत्रपती पुरस्कार आणि आशियाई कबड्डी सुवर्णपदक विजेत्या स्नेहल शिंदे साखरे, संस्थेचे मानद सचिव कांतीलाल गुजर यांच्या शुभहस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी प्रेरणा शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शालिनी गुजर, प्रेरणा बँकेचे संचालक अक्षय गुजर, प्राचार्य कैलास पवळे, मुख्याध्यापक महेंद्र पवार,शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, उद्योजक सागर साखरे, स्वाती साखरे, पर्यवेक्षक कृष्णराव नाईकरे, राजेंद्र देशमुख , क्रीडा विभाग प्रमुख रमेश कदम, अशोक खताळ, आदी मान्यवर उपस्थित होते.
स्नेहल शिंदे म्हणाल्या, जे क्षेत्र आपण निवडतो, त्यातली सर्वोच्च गोष्ट आपण साध्य केली पाहिजे. त्यासाठीची मेहनत करणे आवश्यक असते. तुम्ही भारताचे भविष्य आहात. स्वतःवर विश्वास ठेवा. संयम ठेवा. पाऊल पुढे टाकत रहा. एक दिवस त्याचे फळ नक्की मिळतेच. सातत्य ठेवा. खेळाडू असाल तर मैदान सोडू नका. खेळ आणि अभ्यास याचा विद्यार्थीदशेत समतोल साधा. खेळातून आता करिअर घडण्याची संधी आहे, सरकारी सेवेत दाखल होण्याची संधी असते. खेळातून आपले व्यक्तिमत्व फुलत असते. कोणताही खेळ खेळा, सराव करा, पण त्यात सातत्य ठेवा. खेळामुळे आत्मविश्वास वाढतो. खेळाने एकाग्रता वाढते, ग्रहणशक्ती वाढते. आपण जे आता करू त्यावर आपले भवितव्य ठरत असते. जे कराल ते सर्वोत्कृष्ट करा. भरपूर खेळा आणि भरपूर आनंदी रहा.
प्राचार्य कैलास पवळे म्हणाले, खेळातून विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी,आत्मविश्वास या गोष्टी आत्मसात कराव्यात. शालेय जीवनातच खेळाचा पाया रचला जातो. प्रयत्नाशिवाय काहीच साध्य होत नाही.
पर्यवेक्षक कृष्णराव नाईकरे यांनी मनोगत व्यक्त केले. नाना शिवले यांनी मान्यवर खेळाडूंचा परिचय करून दिला. गौतम दळवी यांनी सूत्रसंचालन केले. रमेश कदम यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र पवार यांनी आभार मानले. दत्तात्रय उबाळे यांनी खेळाडूंना शपथ दिली.
अशोक खताळ, दत्तात्रय उबाळे, पांडुरंग दिवटे, ज्ञानेश्वर बोरसे, दिलीप माळी, मोहन परहर, पुरुषोत्तम पाटील, अर्जुन शेटे, विजय जाधव, प्रवीण कुऱ्हाडे, भिमराव शिरसाठ, सनी मळेकर, सुनीता गोरे, देवयानी पवार, ज्योती धुरपते, शैला हिरवे, मेघना चौगुले, देवयानी वारके, रुपाली कदम, यांनी विशेष परिश्रम घेतले.























Join Our Whatsapp Group