पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाळीव श्वानांसाठी पिंपळे सौदागर येथील गोविंद चौकाजवळ डॉग पार्क बांधले आहे. या उद्यानात पाळीव श्वानांना प्रवेशशुल्क आकारले जाणार आहे. सकाळी व सायंकाळच्या सत्रात एक व्यक्ती व एका श्वानासाठी २० रुपये शुल्क असणार आहे.
महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने हे पार्क १४ जानेवारी २०२४ ला विकसित करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय विभागाने तेथे एक कर्मचारी नियुक्त केला आहे. या पार्कची वेळ सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ अशी आहे. सध्या पार्कमध्ये मोफत प्रवेश दिला जात आहे. पार्कमध्ये पदपथ, स्टेज एरिया, ३ गाळे, शौचालय, पाण्याची सोय, चारही बाजूला सीमाभिंत, स्वतंत्र प्रवेशद्वार, विद्युत व्यवस्था, झाडे, हिरवळीची सोय करण्यात आली आहे.
पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी एक व्यक्ती व एका श्वानाला २० रुपये शुल्क असणार आहे. तर, महिन्याचे शुल्क ५०० रुपये आहे. सेलिब्रेशन पॉईन्टचे शुल्क दोन तासासाठी १ हजार रुपये इतके ठेवण्यात आले आहे.
शुल्क आकारणी करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती तसेच, सर्वसाधारण सभेची मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच डॉर्ग पार्कमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांना शुल्क द्यावे लागणार आहे.