पिंपळे सौदागर (Pclive7.com):- आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघातून लढणारच असे सांगत माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दंड थोपटले आहेत. पिंपळे सौदागरमधील ग्रामस्थ, सोसायटी धारकांसह चिंचवड मतदारसंघातील काटे यांच्या समर्थकांच्या उपस्थितीत आज (दि.१४) एक बैठक संपन्न झाली. मात्र या बैठकीला मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील स्मार्ट सिटीचा चेहरा असलेल्या पिंपळे सौदागर, रहाटणी प्रभागाचे गेली दोन टर्म शत्रुघ्न काटे नेतृत्व करीत आहेत. आज पिंपळे सौदागरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत काटे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी शत्रुघ्न काटे यांना आमदारकी लढवण्यासाठी आग्रह केला. शत्रुघ्न काटे यांनीही चिंचवड विधानसभा लढवण्यावर ठाम असल्याचं जाहीर केले आहे. पक्षश्रेष्ठीने दोन वेळेला महापौर पद, सत्तारूढ पक्षनेते पद आणि स्थायी समितीचे अध्यक्ष पद देऊ असे म्हटलं होते. मात्र, ऐनवेळी पक्षाने काटे यांना डावलण्यात आले होते. पक्षावर नाराज असलेले शत्रुघ्न काटे यांनी आता मात्र माघार घेणार नसल्याचे सांगत चिंचवड विधानसभेच्या मैदानात उतरण्याकरीता दंड थोपटले आहेत.
शत्रुघ्न काटे यांनी प्रामाणिक तसेच एकनिष्ठ राहून शहरात पक्ष वाढीस आपले योगदान दिले. परंतु अजून किती काळ पक्ष असाच अन्याय करणार आहे. पक्षाची महत्वाची पदे फक्त एकाच घराण्याची मक्तेदारी आहे का? असा प्रश्न सर्व कार्यकर्त्यांच्या मनात आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याने फक्त कर्म करुण फळाची अपेक्षा करू नये का? पक्षाच्या अश्या काही धोरणामुळे पक्षात अंतर्गत नाराजगी वाढली आहे अशा भावना समर्थकांनी व्यक्त केल्या.
परंतु आज शत्रुघ्न काटे यांच्या “बालेकिल्ल्यात” कार्यकर्त्यांनी बापु काटे यांना चिंचवडचे आमदार म्हणून विधानसभेवर पाठवण्यासाठी शंख फुकले असून कार्यकर्त्यांनी शत्रुघ्न काटे यांना विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे. यावेळी शत्रुघ्न काटे यांनीही “आता माघार नाही” असा विश्वास देत रणशिंग फुंकले आहे. यावेळी पक्षाने जर विश्वासात घेऊन संधी दिली नाही तर लवकरच सर्व कार्यकर्त्यांसह चर्चा करून आपली पुढची रणनीती ठरवणार असल्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केले आहे.
चिंचवड विधानसभेत भाजपकडून विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या पाठोपाठ शत्रुघ्न काटे हे देखील इच्छुक झाल्याने पक्षश्रेष्ठींची केदुखी वाढू शकते. ऐनवेळी शत्रुघ्न काटे हे बंडखोरी करू शकतात, असेही बोलले जात आहे.