पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने मोशी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यापूर्वीच साशंकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील पुतळ्याच्या काही भागाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुतळा उभारण्यापूर्वी सल्लागार नेमण्यात येऊन त्यावरही कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहे. त्यामुळे आता या छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणी सर्वपक्षीय समिती गठीत करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, नेते अजित गव्हाणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुलभा उबाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम,
माजी नगरसेवक रवी लांडगे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, विनायक रणसुभे आदी उपस्थित होते.
बोऱ्हाडेवाडी विनायकनगर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याचे निश्चित करण्यात आल्यानंतर सदर निवडलेली जागा चुकीची आहे. सदर जागेवर जाण्याकरीता रस्ता अरुंद आहे. पार्किंगची सुविधा पुरेशी उपलब्ध होऊ शकत नाही. पुतळ्याशेजारी टोलेजंग इमारती आहेत. त्यामुळे पुतळ्याच्या सौंदर्याला बाधा पोचू शकते तसेच पुतळ्याला यामुळे अडसर निर्माण होईल. त्याचप्रमाणे सदर निवडलेली जागा मुख्य रस्त्यापासून आत आहे. अशा मुख्य बाबी सामाजिक संघटना, नागरिक, इतिहास प्रेमी तसेच राजकीय पक्षांनी निदर्शनास आणून देत सदर ठिकाणी पुतळा उभा करण्यासाठी विरोध केला होता. मात्र राजकीय श्रेयवाद लाटण्यासाठी आणि स्टंटबाजीमध्ये त्याच जागेवर पुतळा उभा करण्याचे काम रेटून नेण्यात आले आणि चौथऱ्याचे काम देखील सुरू करण्यात आले.
सुरवातीला विनायकनगर या जागेवर चौथरा उभारण्याचे काम मे. धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला दि. 16 मार्च 2020 ला 12.50 कोटी रुपयाला देण्यात आले. सदर कामाची मुदत ही १८ महिने होती. वेळेत काम झाले नाही म्हणून पुन्हा 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुरत वाढ देण्यात झाली. आजपर्यंत 40%, काम पुर्ण झाले त्याचे 5.50 कोटी रुपये बिल ठेकेदाराला अदा झाले आहे. त्यांनतर जागेमध्ये बदल करण्याचे ठरले. मग झालेल्या 5.50 कोटी रूपये खर्च याला जबाबदार कोण रहा प्रश्न उभा राहिलेला असतानाच दुसरा पुतळा उभारण्याचा घाट म्हणजे थोडक्यात झालेल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न आहे. आता नव्याने होणाऱ्या खर्चाचा आकडा मात्र गुलदस्त्यात ठेवण्याचा खटाटोप सुरू आहे.
नवीन जागी पुतळा उभारण्यासाठी जागेची मागणी पीएमआरडीएकडे करण्यात आली. पीएमआरडीए हा शासनाचाच भाग असताना सुद्धा सदर जागेसाठी त्यांनी 49 कोटी 74 हजार 272 रुपयांची मागणी केली आहे. सदर जागा आज ताब्यात दिलेली असली तरी भविष्यात या जागे पोटी एक रुपयाही देण्यात येऊ नये अशी आमची आग्रही मागणी आहे. पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राच्या जागेमध्ये पुतळा उभारण्याची परवानगी मिळाल्यानंतर या जागेत चौथरा उभा करण्यासाठी पुन्हा पंधरा कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. यासाठी ठेकेदाराशी संगणमत करण्यात आले. नियम व अटी शर्ती लागू करताना ठेकेदार डोळ्यासमोर ठेवण्यात आला. त्यामुळे नवीन जागेवर पुतळा उभारताना पुन्हा धनेश्वर कन्स्ट्रक्शन याच ठेकेदाराला चौथरा बांधण्याचे काम देण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा करणाऱ्या राम सुतार या दिल्ली येथील शिल्पकाराला 32 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आजपर्यंत या ठेकेदाराला महापालिकेतून 22 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

























Join Our Whatsapp Group