पिंपळे सौदागर (Pclive7.com):- विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी नावाजलेल्या पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे उन्न’ती’ चा गणपती महोत्सव अंतर्गत इको फ़्रेंडली गणपती कार्यशाळा संपन्न झाली. पिंपळे सौदागर मधील २५० हुन अधिक मुलांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. कला शिक्षक सुधीर लांडगे आणि भगवान भोसले, रश्मी जुग्ले, संगीता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे सौदागर मधील ३५० हुन अधिक मुलांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. पर्यावरण पूरक मूर्ती बनविण्यासाठी लागणारी शाडू माती उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे मुलांना मोफत पुरविण्यात आली.
यावेळी सुप्रसिद्ध सिने अभिनेते ‘दे धक्का’ फेम संजय खापरे यांची उपस्थिती या कार्यशाळेचे आकर्षण ठरली. संजय खापरे यांनी मुलांशी संवाद साधत त्यांना पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून दिले.
या उपक्रमाबद्दल माहिती देताना उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई भिसे म्हणाल्या “स्थापनेपासून उन्नती सोशल फाऊंडेशनचा गणपती महोत्सव हा विविधतेने नटलेला आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने आम्ही दरवर्षी मूर्ती कार्यशाळा आयोजित करत असतो. स्वतःच्या हाताने बनवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मुले आपल्या घरी करतात. हा एकप्रकारे गणेशभक्तीचा सर्वोच्च बिंदू आहे.”
माजी महापौर हिरा नानी घुले म्हणाल्या “दिवसेंदिवस गणेशोत्सवाचे स्वरूप पालटत आहे. गणेशोत्सव अधिक प्रबोधनपर करण्यासाठी सामाजिक देखावे यांच्यासोबतच गणपतीची मूर्ती आणि आरास अधिक पर्यावरणपूरक करणे आवश्यक आहे. येणाऱ्या नवीन पिढीला पर्यावरणाचे महत्त्व समजून देण्यासाठी ही इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा मार्गदर्शक ठरणार आहे.”
उपक्रमाचे कौतुक करताना अभिनेते संजय खापरे म्हणाले “उन्नती सोशल फाऊंडेशनच्या कामाबद्दल ऐकून होतो. आज गणेश मूर्ती कार्यशाळेच्या निमित्ताने प्रत्यक्ष त्यांच्या कामाबद्दल संस्थापक संजय भिसे यांच्याकडून जाणून घेतले. वाढते प्रदूषण यामुळे प्रत्येक सण पर्यावरणपूरक असण्याकडे आपला कल आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी शाडू मातीच्या मूर्ती शिवाय पर्याय नाही.सुबक आणि स्वतःच्या हाताने बनविलेल्या मुर्त्या आपल्या घरात स्थापन केल्याने एका वेगळ्याच प्रकारच्या सृजनशीलतेचा अनुभव आपल्याला प्राप्त होणार आहे.”
सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले. तर आभार रमेश वाणी यांनी मानले. याप्रसंगी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई भिसे संस्थापक संजय भिसे, माजी महापौर हिरा नानी घुले, सभापती चेतन घुले, अभिनेते संजय खापरे, समाज सेविका शारदा मुंडे, छत्रपती पुरस्कार मानकरी नितीन घुले, सुभाषचंद्र पवार, जगन्नाथ वाळके, वाल्मीक काटे, कुंदन झिंजूर्डे, योगेश चौधरी, सागर घुले यांच्यासह उन्नती सोशल फाऊंडेशनचे सर्व सदस्य, विठाई वाचनालयाचे सदस्य, जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि पिंपळे सौदागर मधील नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.