कधी होणार निवडणुका?
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १,००, १८६ मतदान केंद्रे असतील. मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्र लोकशाहीच्या उत्सवात चांगले योगदान देईल. दोन दिवस आम्ही राज्यातील राजकीय पक्षांशी चर्चा केली. आगामी सण आणि उत्सवाच्या नंतर निवडणुका जाहीर कराव्यात असे राजकीय पक्षांचे म्हणणे असल्याचे ते म्हणाले. निवडणूक आयोगाने या दौऱ्यात बसपा, आप, सीपीआय, मनसे, शिवसेना, शिवसेना उबाठा, काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी यांच्यासहित ११ पक्षांची भेट घेतली आणि त्यांची मते जाणून घेतली. निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी सणांची काळजी घ्यावी, असे सर्वांनी मिळून सांगितल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे दिवाळीनंतरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील असे स्पष्ट झाले आहे.
विविध पक्षांच्या मागण्या..
काही पक्षांनी पैशाच्या ताकदीवर अंकुश ठेवण्याचीही विनंती केली. तर काहींनी मतदान केंद्र दूर असल्याने वृद्धांसाठी वाहनांची व्यवस्था करण्याची मागणी केली. निवडणुकीची तारीख सोयीची असावी, अशीही पक्षांची मागणी आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काही गैरसोयी दिसल्या, मतदारांना पुन्हा असे अनुभव येऊ नयेत. तसेच फेक न्यूजच्या प्रसारावर बंदी घालावी. काही पक्षांनी पोलिंग एजंट एकाच मतदारसंघातील असावा, अशीही विनंती केली. तर मतदान केंद्रांवर मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्याची मागणीही काही पक्षांनी केली.