पिंपरी (Pclive7.com):- रावेत- किवळे प्रभाग क्रमांक १६ मधील विविध सार्वजनिक ठिकाणी, फुटपाथ तसेच स्ट्रीट लाईटच्या खांबांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर, फ्लेक्स आणि केबल वायर लावण्यात आल्यामुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत नगरसेविका तरस यांनी निवेदन देत प्रभागातील सर्व सार्वजनिक रस्ते, फुटपाथ आणि स्ट्रीट लाईटच्या खांबांवर लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर आणि फ्लेक्स तात्काळ हटवावेत, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारे कोणालाही अनधिकृत जाहिरात फलक लावण्यास परवानगी देऊ नये, असेही पत्रात नमूद केले आहे.

याशिवाय स्ट्रीट लाईटच्या खांबांवर टाकण्यात आलेल्या अनधिकृत वायर आणि केबल्समुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. संबंधित विभागाने या सर्व वायर तातडीने काढून टाकून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी केली आहे.

महापालिका प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांनीही या मागणीचे स्वागत करत सार्वजनिक ठिकाणे अतिक्रमणमुक्त आणि सुरक्षित करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.





















Join Our Whatsapp Group