पिंपरी चिंचवड: संघ शताब्दी मंथन कार्यक्रमात मान्यवरांचा सहभाग
चिंचवड (Pclive7.com):- वैभवशाली राष्ट्रनिर्माणासाठी राष्ट्रचेतना जागृती गरजेची असून त्याकरिता समाजातील सज्जनशक्ती संघटन करणे व जातीपंथ, भाषा प्रांत यापलीकडे राष्ट्रप्रथम हा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कार्य गेल्या १०० वर्षांपासून करीत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, संपादक प्रफुल्ल केतकर यांनी केले. ते ऑटोक्लस्टर प्रेक्षागृहात पिंपरी चिंचवड जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित संघ शताब्दी मंथन या महत्वपूर्ण वैचारिक कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, पुणे विभाग प्रचार प्रमुख पंकज जयस्वाल उपस्थित होते.

पुढे बोलताना केतकर म्हणाले, संघाची स्थापना दूरदृष्टीचा, विखुरलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्याचा प्रयोग होता. त्या काळात संघर्ष होता, गैरसमज होते, विरोध होता; पण प्रत्येक अडचणीतून संघ अधिक सक्षम होत गेला. विविध सरसंघचालकांनी या विचाराला केवळ जपले नाही, तर काळानुरूप विस्तारही दिला.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभारताना लोकांमध्ये “हा लढा माझाही आहे” ही भावना निर्माण केली. आत्मबोध आणि शत्रूबोध या दोन गोष्टी त्यांनी जनमानसात रुजवल्या. हाच धडा आजही तितकाच महत्त्वाचा आहे. सामर्थ्यशाली, वैभवशाली भारत ही केवळ राजकीय संकल्पना नाही, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि मानसिक स्वावलंबनाची प्रक्रिया आहे. लोकशाही टिकवायची असेल, तर संघर्ष नव्हे तर संवाद आवश्यक असल्याचे सांगून संघामुळेच आणीबाणीत लोकशाही आणि संविधान रक्षण झाल्याचे संघ सांगत नाही तर आणीबाणीत स्वयंसेवकांसोबत तुरुंगात असलेल्या कमुनिस्ट आणि जमाते इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी सांगितल्याचे त्यांनी अधोरेखित केले. संघाला समाजात वेगळे संघटन उभे करायचे नसून संपूर्ण समाजाचे संघटन करायचे असल्याचे सांगितले.

समाजातील प्रत्येक घटक विचारधारा वेगळी असली तरी राष्ट्रहिताच्या धाग्यात जोडला गेला पाहिजे. देशासाठी काम करणारा प्रत्येक जण, कोणत्याही विचारसरणीचा असो, तो राष्ट्रनिर्मितीचाच भाग आहे ही व्यापक भूमिका संघात मांडली जाते.
‘भारत कधीच राष्ट्र नव्हता’ हा इंग्रजांचा दावा स्वतःच खोटा ठरतो कारण त्यांनीच ‘ईस्ट इंडिया कंपनी’ असे नाव दिले. नावातच ‘इंडिया’ होते, म्हणजे ओळख होती. इतिहासात अनेकदा आक्रमकांचे उदात्तीकरण झाले, तर आपल्या परंपरा आणि संघर्ष झाकोळले गेले ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. संघ केवळ संघटना नसून राष्ट्र प्रथम हा विचार आहे. या विचारातून घडलेल्या व्यक्तींनी राष्ट्रनिर्मितीत विविध स्तरांवर योगदान दिले आहे, देत आहेत.
‘मेरा ही सही ‘ पेक्षा ‘मेरा भी सही’ हा आपल्या संस्कृतीचा धागा संघ पुढे नेतो. भारताला सामर्थ्यशाली बनवण्याच्या या प्रवासात प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देणे हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनिरुद्ध सराफ व अनिकेत यांचे बासरीवादन व त्यानंतर भारतमाता पूजन झाले. प्रास्ताविक व परिचय सारंग पापळकर यांनी केले. पंकज जयस्वाल यांनी पंचपरिवर्तन – कुटुंब प्रबोधन, नागरी कर्तव्ये, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्व बोध विषयावर उद्बोधन केले. यावेळी राम गहलोत यांनी पंच परिवर्तन या विषयावर भव्य रांगोळी काढली होती.
सूत्रसंचालन अजय शिंदे तर आभार वैभव वाघोलीकर यांनी मानले. प्रज्ञा फुलपगार यांनी वंदे मातरम् सादर केले. कार्यक्रमाला शहरातील माध्यम व वैचारिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group