पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १६ मधील रावेत परिसरातील काही रस्ते अपघातप्रवण ठरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात रविंद्र लातुरे यांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधले गेले आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका रेश्मा कातळे यांनी संबंधित प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

नगरसेविका रेश्मा कातळे यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करत धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अपघात टाळण्यासाठी संबंधित भागांमध्ये गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविणे, वेगमर्यादा दर्शविणारे फलक उभारणे आणि इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना त्वरित राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

स्थानिक नागरिकांनीही परिसरातील काही रस्त्यांवर वाहने भरधाव वेगाने चालवली जात असल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याची तक्रार केली आहे. विशेषतः सोसायट्यांसमोरील रस्ते, शाळा परिसर, रावेत आणि किवळे येथील अंतर्गत रस्ते तसेच प्रमुख चौकांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

यासंदर्भात नगरसेविका रेश्मा कातळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून लवकरात लवकर कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आगामी पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी केली आहे.





















Join Our Whatsapp Group