पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत दहा नगरसेवकांच्या निवडीचा विषय सत्ताधारी भाजपने थेट दप्तरी दाखल केला आहे. त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवकांची निवड तीन महिन्यांनंतर म्हणजे थेट ऑक्टोबर महिन्यात सभा पटलावर येऊ शकतो. भाजपच्या या निर्णयाला विरोधकांनी विरोध केला असला, तरी त्याचा काही फायदा झाला नाही.

महापालिकेची सर्वधारण सभा सोमवारी (दि.१५) झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे होते. सभेच्या विषयपत्रिकेवर स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय पहिलाच होता. महापौरांनी तो विषय सभेच्या शेवटी घेण्यात येईल, असे जाहीर केले. सभेच्या शेवटी त्या विषयावर सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले, की स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय प्रशासनाकडून अर्धवट व चुकीच्या पद्धतीने सादर झाला आहे. यापूर्वीदेखील महापालिका सभेत त्यामध्ये बदल सूचविण्यात आले होते. त्याप्रमाणे तो विषय फेरप्रक्रिया करताना, फेरदुरुस्ती करून संपूर्ण संख्येसह सभागृहासमोर मान्यतेसाठी ठेवण्यात यावा. तो प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात यावा.

स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय दप्तरी दाखल करण्यास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी विरोध केला. तुमची नावे काय परदेशातून येणार आहे का, ती सात नावे नंतर ठरवा. मात्र, आमची तीन वैध ठरलेल्या नावांना मान्यता द्या. नाहक स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय लांबणीवर टाकला जात असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. महापौर रवी लांडगे यांनी तो विषय दप्तरी दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. दरम्यान, दप्तरी दाखल केलेला विषय तीन महिने सभापटलावर घेता येत नाही. त्यामुळे तो विषय ऑक्टोबर महिन्यातील सभेसमोर येऊ शकतो. त्यासाठी दहा स्वीकृत नगरसेवक निवडीची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केलेली तीन नावे बदलली जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्व प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार..
नगरसेवक संख्येनुसार भाजपचे ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ स्वीकृत नगरसेवक संख्या आहे. त्यासाठी आयुक्त भाजपचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची बैठक घेऊन त्याबाबत सूचना करतील. त्यानंतर त्यांच्याकडून पक्षाने शिफारस केलेल्या नावाच्या यादीसह आवश्यक कागदपत्रे आयुक्तांकडून स्वीकारली जातील. त्या अर्जाची छाननी केली जाईल. त्यानंतर ती कागदपत्रे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून पडताळणी करून घेतली जातील. ती सर्व प्रक्रिया झाल्यानंतर ते अर्ज वैध की अवैध हे ठरले जाईल. त्यानंतर सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय मांडला जाईल. त्याला सभागृहाने अंतिम मान्यता दिल्यानंतर स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रिया पूर्ण होईल. या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसची तीन नावे बदलली जाऊ शकतात, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.




















Join Our Whatsapp Group