पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी, काळभोरनगर, मोहननगर भागातील महापालिका शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये इमारती धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतरही या इमारतींमध्ये वर्ग भरविले जात असल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी सर्वसाधारण सभेत महापौर, आयुक्तांचे लक्ष वेधले.

नगरसेवक प्रमोद कुटे म्हणाले, आकुर्डीतील कांतिलाल खिंवसरा शाळा इमारतीचे निम्मे बांधकाम पाच वर्षांपूर्वी पाडून ठेवले आहे. एका वर्गात दोन वर्ग भरविले जात आहेत. हे मोठे दुर्देव आहे. काळभोरनगर परिसरातील शाळा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले आहे. त्यानंतरही धोकादायक इमारतीमध्ये वर्ग भरविले जातात. एकच शिक्षिका तिसरी आणि आठवीचा वर्ग एकाच वर्गात घेतात. ही मोठी शोकांतिका आहे. आकुर्डी प्रभागात महापालिकेच्या माध्यमातून पाच शाळा चालविल्या जातात. १८०, २७५, १५० अशी शाळांची पटसंख्या आहे. अतिशय वाईट परिस्थिती महापालिका शाळांची झाली आहे.

एका वर्गात दोन वर्ग भरविले जातात. तिसरी, चौथी, पाचवी, नववी असे एकत्र वर्ग घेतले जातात. महापौरांनी यात लक्ष घालावे. महापालिका शाळांमध्ये येण्यासाठी विद्यार्थी, पालक उत्सुक नसतात. त्यासाठी एक धोरण ठरविणे आवश्यक आहे. महापालिकेकडे ३८ आरक्षणे ताब्यात आली आहेत. त्याबाबत महापालिकेचे धोरण काय आहे. ही ३८ आरक्षणे विकसित करण्याएवढा निधी महापालिकेकडे उपलब्ध आहे का, महापालिकेने आरटीईच्या कोटा वाढविण्यात यावा. खासगी संस्थेच्या माध्यमातून मोफत शिक्षण देता येईल का, याचा अभ्यास केला पाहिजे, असेही नगरसेवक कुटे म्हणाले.




















Join Our Whatsapp Group