पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी प्रभाग क्रमांक २७ येथील महापालिका शाळेची अवस्था अत्यंत गंभीर व चिंताजनक बनली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ नवीन शाळा इमारत उभारण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका अर्चना विनोद तापकीर यांनी शिक्षण समिती सभापती व शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अर्चना तापकीर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहाटणी येथील महापालिका शाळेसाठी जागा आरक्षित असूनही अनेक वर्षांपासून नवीन इमारत उभारण्याचे काम रखडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपुऱ्या व असुरक्षित जागेत शिक्षण घ्यावे लागत आहे. काही विद्यार्थी पत्र्याच्या खोल्यांमध्ये बसून शिक्षण घेत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे उपलब्ध जागा अपुरी पडत असून शिक्षण प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि शैक्षणिक विकासाचा विचार करता आरक्षित जागेवर तात्काळ सुसज्ज व नवीन शाळा इमारत उभारण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या गंभीर विषयाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन शाळा इमारतीच्या बांधकामाची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी नगरसेविका अर्चना तापकीर यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group