पिंपळे सौदागर (Pclive7.com):- चित्रपट सृष्टीतील पडद्यामागच्या घटना, काही हळवे प्रसंग आणि मजेदार किस्स्यांच्या आठवणीने पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ नागरिकांमध्ये रुपेरी स्मृतींच्या आठवणींना उजाळा मिळाला. निमित्त होते ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनच्या मासिक मेळाव्यातील ख्यातनाम लेखक आणि सिनेपत्रकार धनंजय कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे.

पिंपळे सौदागर येथील स्व. बाळासाहेब कुंजीर क्रिडांगणावर गुरुवार दि.३० रोजी आयोजित करण्यात आलेल्या “किस्से सिनेमाचे” या कार्यक्रमात धनंजय कुलकर्णी यांनी “कुली” चित्रपटाच्या वेळी अमिताभ बच्चन अपघातातून बरा होण्यासाठी बडोद्याच्या चाहत्याने मुंबईपर्यंत उलट्या पावलाने केलेला प्रवास, पुण्यातील पानशेत धरण फुटल्यानंतर होडी ढकलण्यासाठी ग. दि. माडगूळकर यांनी केलेली मदत, करवा चौथमुळे जितेंद्रचे वाचलेले प्राण, धर्मेंद्रची मुकेशने मागितलेली माफी आदि आठवणी सांगून उपस्थितांची दाद मिळवली.

ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुभाषचंद्र पवार, सचिव सखाराम ढाकणे, उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी तसेच शकुंतला शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भामिनी महाले, शोभा राजगुरे, निर्मला कासार आणि सुरेखा पाटील यांनी एक मे चे औचित्य साधून महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ केला.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुभाषचंद्र पवार यांनी केले. सुत्रसंचलनाची जबाबदारी भामिनी महाले यांनी सांभाळली तर सखाराम ढाकणे यांनी आभार मानले.




















Join Our Whatsapp Group