पिंपरी (Pclive7.com):- नवी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळे निलख, विशाल नगर परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. या परिसरातील अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली असून सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेत आहेत. तरुणी, महिला, जेष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. गुन्हेगारांवर व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. पिंपळे निलख, विशाल नगर परिसरातील अवैध धंदे बंद करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन साठे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मंगळवारी सचिन साठे यांनी पोलीस आयुक्तालय व नवी सांगवी पोलीस स्टेशन येथे पत्र दिले. यावेळी परिसरातील महिलांसोबत सह्यांचे निवेदन देखील देण्यात आले.
या पत्रात साठे यांनी पुढे म्हटले आहे की, सुजाण नागरिक जर पोलीस स्टेशनमध्ये बेकायदेशीर धंद्यांविषयी तक्रार करण्यास गेले, तर त्यांची दखल घेतली जात नाही. या परिसरात सर्रासपणे दारू, हातभट्टी, गुटखा, जुगार असे धंदे राजेरोसपणे सुरू आहेत. साई मंदिराजवळ, सार्वजनिक शौचालय जवळ, मोकळ्या मैदानालगत, शाळा व पीएमपीच्या बस स्थानक परिसरात, नदीकिनारी असे अनेक बेकायदेशीर धंदे दिवसाढवळ्या सुरू असून पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करीत आहे. असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
या परिसरातील सर्व बेकायदेशीर धंदे पुढील १५ दिवसात बंद करावेत, अन्यथा येथील नागरिकांकडून जनआंदोलन उभारण्यात येईल. यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा ही या पत्राद्वारे देण्यात आला आहे.