भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; पिंपरी, आकुर्डीतील लाभार्थींना सदनिकांचे होणार वाटप
पिंपरी (Pclive7.com):- केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पिंपरी व आकुर्डी येथे सदनिका निर्माण केल्या आहेत. या प्रकल्पातील लाभार्थींचा यावर्षीचा दसरा गोड होणार आहे. महापालिका प्रशासनाने सदर प्रकल्पाचा चावी वाटप कार्यक्रम लवकरच होणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आकुर्डी येथे ५६८ सदनिकांच्या सहा इमारती बांधल्या आहेत. तसेच, पिंपरी येथे ३७० सदनिकांसाठी दोन इमारती बांधल्या आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार आणि लाभार्थींचा स्वहिस्सा आहे. सदर प्रकल्पांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे. लाभार्थींही निश्चित झाले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून लाभार्थी गृहकर्जाचे हप्ते भरीत आहेत. मात्र, प्रशासनाकडून सदनिकाधारकांना ताबा मिळाला नव्हता. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महानगरपालिका आयुक्त व प्रशासन यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यावेळी ‘लवकरच कार्यवाही करु’, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्यानुसार हा प्रश्न आता मार्गी लागला असून, आठवडाभरात चावी वाटप होणार आहे.
पिंपरी आणि आकुर्डी प्रधानमंत्री आवास योजना आरक्षण ‘बेघरांसाठी घर’ असे होते. मात्र, सदर प्रकल्पाची व्यापक जनहिताच्या दृष्टीने आरक्षणाचा उद्देश ‘आर्थिक दुर्बलांसाठी घर’ असा करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. प्रकल्प उभारणी करुन लाभार्थींसाठी सोडत प्रक्रिया करण्यात आली. लाभार्थी निश्चित करुन आता सदनिकांचे वाटप होत आहे. प्रकल्पाचे आरक्षण बदलण्यापासून भूमिपूजन ते लोकार्पण हा उद्देश साध्य झाला. याचे समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घर’ या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवडमध्ये विविध ठिकाणी ‘प्रधानमंत्री आवास’ योजना राबवण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. तसेच, शहर झोपडपट्टीमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पिंपरी आणि आकुर्डी प्रकल्पातील लाभार्थींना अनेक दिवसांपासून सदनिकांचा ताबा मिळण्याची प्रतीक्षा होती. आता या प्रकल्पाचे लोकार्पण होणार असून, सदनिकाधारकांना हक्काचे घर मिळणार आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.