मुंबई (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सकाळी कूपर रुग्णालयात भेट घेतली. या हल्ल्याचा निषेध करताना अजित पवार म्हणाले की, “पोलीस या हत्येचा तपास करत आहेत, दोन लोकांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहे आणि पाच वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोलिसांच्या टीम शोध घेत आहेत.” सिद्दीकी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना अजित पवार म्हणाले की, बाबा आता आमच्यात नाहीत यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. या कठीण काळात आम्ही झिशान आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत आहोत, असे पवार म्हणाले.
शवविच्छेदनानंतर सिद्दीकी यांचा मृतदेह त्यांच्या घरी नेऊन जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमचे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्या दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर १३ ऑक्टोबर म्हणजेच रविवारचे पक्षाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.