पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या दुकानाला अचानक आग लागली. या आगीमध्ये तीन दुकाने जळून खाक झाली. ही घटना रविवारी (दि.०१) दुपारी साडेचारच्या सुमारास लागली. अग्निशमन विभागाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले होते. काही वेळेत आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन विभागाच्या जवानांना यश मिळाले. आगीमध्ये तीन दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
रविवार असल्याने दुकाने बंद होती. बंद असलेल्या दुकानाला साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत आग शेजारी असलेल्या आईसक्रीम आणि भांड्याच्या दुकानात पसरली. मोबाईल फोन, आईसक्रीम आणि भांड्याचे अशा एकूण तिन्ही दुकानांना लागलेली आग अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ आटोक्यात आणली. घटनास्थळी संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचे दोन, प्राधिकरण अग्निशमन विभागाचा एक आणि रहाटणी अग्निशमन विभागाचा एक असे एकूण चार बंबांच्या साहाय्याने आग विझवण्याचे काम करण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.