भोसरी (Pclive7.com):- भोसरीतील भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई पोपटराव फुगे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. स्थानिक नेतृत्वामुळे नाराज असून “आम्हाला शरद पवार साहेब यांचे नेतृत्व मान्य असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात गव्हाणे यांच्या माध्यमातून या शहराला सुसंस्कृत नेता मिळणार आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. दरम्यान भिमाबाई फुगे तसेच सम्राट फुगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे अजित गव्हाणे यांची ताकद वाढली आहे.
बारामती येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये भिमाबाई फुगे यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, विशाल वाकडकर, विशाल काळभोर, हभप राजाराम महाराज फुगे, राणोजी कंद, दामोदर फुगे, गणपत गव्हाणे रोहिदास माने आदी उपस्थित होते. भीमाबाई फुगे यांच्या सोबत सम्राट फुगे, प्रसाद कोलते, प्रशांत लांडगे सुदेश लोखंडे, गणेश कंद आदींनी पक्ष प्रवेश केला आहे.
भीमाबाई फुगे या प्रभाग क्रमांक सात भोसरी गावठाण मतदार संघातून गेल्या पंचवार्षिक मध्ये निवडून आलेल्या होत्या. त्यांनी दोन हजार सातशे ७८ मतांनी विजय संपादन केला आहे. नगरसेविका भीमाबाई फुगे यांचे माहेर कासारवाडीचे. त्यांचे भाऊ दत्तात्रेय लांडगे तसेच भावजय सुरेखा लांडगे भीमाबाई फुगे हे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत. त्यांचे सासरे दिवंगत सदाशिवराव फुगे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा आजही भोसरी पंचक्रोशीत सांगितला जातो. त्यांचे पती पोपटराव फुगे हे पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष होते. तर दीर हभप राजाराम महाराज फुगे हे कीर्तनकार आहेत. नगरसेविका भीमाबाई फुगे या नवज्योत मित्र मंडळाच्या महिलाध्यक्षा आहेत. नातेगोते तसेच सामाजिक कार्याच्या माध्यमातून भीमाबाई फुगे यांचा भोसरी गावठाण भागामध्ये प्रभाव आहे.