पुणे (Pclive7.com):- भोर विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट कमिशनींगच्या कामकाजाचे मोबाईलवरुन बेकायदेशीरपणे व्हिडीओ चित्रीकरण करुन समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) प्रसारित केल्याबद्दल दोन उमेदवारांच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करुन पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली आहे.
सरदार कान्होजी जेधे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोर येथे बुधवारी (दि. 13 नोव्हेंबर) ईव्हीएम व व्हीव्हीपॅट कमीशनींगचे कामकाज सुरु होते. यावेळी मोबाईल आदी उपकरणांना बंदी असताना उमेदवार शंकर हिरामण मांडेकर यांचे प्रतिनिधी विजय हनुमंत राऊत, रा. लवळे (ता. मुळशी) आणि कुलदिप सुदाम कोंडे यांचे प्रतिनिधी नारायण आनंदराव कोंडे रा. केळवडे (ता. भोर) यांनी बेकायदेशीरपणे मोबाईल घेऊन येऊन मॉकपोलचे चित्रीकरण करुन ते सोशल मीडियावर प्रसारित करुन गोपनियतेचा भंग केला. त्यामुळे विजय हनुमंत राऊत आणि नारायण आनंदराव कोंडे यांच्यावर 14 नोव्हेंबर रोजी भोर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.222/2024, बी.एन.एस.171(1), 223, आय.टी. अॅक्ट 72 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. या आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.
या घटनेचे गांर्भीय लक्षात घेता घेता जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर येथे भेट देवून घटनेची माहिती घेतली, असेही डॉ. खरात यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी:- ईव्हीएम कमिशनींग, मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र आदी ठिकाणी निवडणूक प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यादरम्यान निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, मतदान प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी, मतदार, वार्ताहर आदी कोणाही व्यक्तीला कोणताही मोबाईल, स्मार्टवॉच, इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येण्यास पूर्णत: बंदी आहे. तसेच निवडणूक कामकाजाचे व्हिडीओ तसेच छायाचित्रे काढून विविध व्हॉटस्अॅप ग्रुप, सोशल मीडियावर प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा आहे. असे करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येईल.