पिंपळे सौदागर मधील मतदारांच्या गाठीभेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद
चिंचवड (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील सर्वाधिक विकसित प्रभाग म्हणून आज पिंपळे सौदागरची ओळख आहे. एक छोटं गाव ते आज स्मार्ट पिंपळे सौदागर असा विकासात्मक प्रवास केवळ महायुतीमुळेच होऊ शकला. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ यांच्या प्रयत्नमुळेच या परिसराचा कायापालट झाला. त्यांचाच विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी शंकर जगताप हे आता निवडणुकीत उतरले आहेत. त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन आमदार अश्विनी जगताप यांनी पिंपळे सौदागर वासियांना केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपा – राष्ट्रवादी – शिवसेना – आरपीआय (आठवले) – मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी पिंपळे सौदागर परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी परिसरातील अनेक सोसायटी मंदिरे जैन मंदिर आदी ठिकाणी जाऊन मतदारांची संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्यासोबत माजी नगरसेविका निर्मला कुटे, सामाजिक कार्यकर्ते जयनाथ काटे, कुंदा भिसे, अनिता काटे, संजय भिसे, संदेश काटे, संदीप काटे, सोमनाथ काटे, अतुल पाटील, राजु शेलार, मनीष कुलकर्णी, साहेबराव काटे, घणशाम निषाद, राकेश काळे, संकेत कुटे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपळे सौदागर येथील जनभेटी दरम्यान आमदार अश्विनी जगताप यांनी स्थानिक नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. नागरिकांच्या उत्साही स्वागताने आणि प्रचंड पाठिंब्याने प्रचार दौऱ्याला नवी ऊर्जा मिळाली. शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ झालेल्या या भेटीमध्ये परिसरातील लोकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे, एक सामर्थ्यवान आणि विश्वासार्ह नेतृत्व म्हणून जगताप कुटुंबावरचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाला. यामुळे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठीची बांधिलकी अधिक दृढ झाली असल्याचे मत आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केले.
आमदार अश्विनी जगताप पुढे म्हणाल्या की, जगताप कुटुंब नेहमीच लोकहिताचे प्रश्न मांडण्यात आणि त्यावर ठोस उपाययोजना राबवण्यात अग्रेसर राहिले आहे. पिंपळे सौदागरचा विकास हा एक महत्त्वाचा मुद्दा असून त्यासाठी या भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अश्विनी जगताप यांनी यावेळी स्थानिकांना आश्वासन दिले की, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रभागाचा अभूतपूर्व विकास घडवून आणण्यासाठी शंकर जगताप सतत कार्यरत राहतील. पिंपळे सौदागर येथील उर्वरित आरक्षण लवकरात लवकर विकसित करून त्या ठिकाणी लोकोपयोगी प्रकल्प राबविण्यात येतील. वाढत्या लोकसंख्येमुळे या भागात सध्या पाण्याची कमतरता भेडसावत आहे, लवकरच ज्यादाचे पाणी देऊन पाणी प्रश्न देखील मार्गी लावण्यात येईल. या परिसरात लवकरच पोस्ट ऑफिस देखील उभारण्यात येणार आहे. तसेच काही ठिकाणी ट्रॅफिकची समस्या उद्भवत असून त्यावर देखील लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन आमदार अश्विनी जगताप यांनी यावेळी मतदारांना दिले.