पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनची सन २०२४-२५ ची निवडणूक शनिवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार असून जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमा अन्वये आज (दि.२८) रोजी अनेक उमेदवारांनी माघार घेतली असल्याने पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. गौरव वाळुंज तर सचिव पदी ॲड. उमेश खंदारे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सदर निवडणुकीसाठी अध्यक्ष व सचिव पदासाठी प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले होते. यामधील अध्यक्ष पदाचे उमेदवार ॲड. मुकुंद ओव्हाळ तर सचिव पदाचे उमेदवार ॲड. गणेश राऊत यांनी अर्ज मागे घेतल्याने अध्यक्ष व सचिव या दोन मुख्य पदांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
याचबरोबर कार्यकारिणीतील महिला सचिव पदी ॲड. रीना मगदूम, सह-सचिव पदी ॲड. राकेश जैद, खजिनदार पदी ॲड. अक्षय फुगे, हिशोब तपासणीस पदी ॲड. शंकर घंगाळे, तर सदस्य पदी ॲड. विकास शर्मा, ॲड. संघर्ष सूर्यवंशी, ॲड. मानसी उदासी, ॲड. संकेत सरोदे, ॲड. राजेश राजपुरोहित, ॲड. सीमा शर्मा यांची सुद्धा बिनविरोध निवड झाली असून कार्यकारिणीतील फक्त उपाध्यक्ष या पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी ॲड. अनिल पवार, ॲड. अतुल कांबळे व ॲड. पल्लवी विघ्ने यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
सदर निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष ॲड. रामराजे जी. भोसले पाटील आणि कार्यकारिणी द्वारे ॲड. सुशील मंचरकर यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून ॲड. संगीता परब, ॲड. शंकर पल्ले, ॲड. वैभव कल्याणकर यांची निवडणूक अधिकारी सहायक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
तसेच सदर निवडणूक ही बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या नियमानुसार व त्यांनी नेमलेले निरीक्षक ॲड. श्रीकांत अगस्ते यांच्या नेतृत्वाखाली शनिवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी नेहरूनगर, पिंपरी न्यायालयात सकाळी १० ते सायंकाळी ०५:३० वाजता होणार आहे. यामध्ये पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या सर्व सभासदांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावे, असे आवाहन बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.