पिंपरी (Pclive7.com):- शासकीय कार्यालयात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येत होते. त्याची दखल घेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सरसकट हेल्मटसक्तीची अंलबजावणी करा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसह आता सामान्य दुचाकीस्वारांना हेल्मेटशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
अपर पोलिस महासंचालकांनी २५ नोव्हेंबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरात हेल्मेटसक्ती करावी, असा आदेश जारी केला आहे. वाहतूक पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच शासकीय कार्यालयांमध्येही हेल्मेटसक्तीचा केवळ सोपस्कार पाळला जातो. दरम्यान महापालिकेच्या वतीने हेल्मेट सक्ती लागू केली आहे. प्रवेशद्वारावर महापालिकेतील कर्मचारी हे हेल्मेटविना असतील, तर प्रवेश दिला जात नव्हता. मात्र, आता प्रशासनाने महापालिका भवनात येणाऱ्या सर्वांनाच हेल्मेट सक्ती केली आहे. याबाबतच्या सूचना पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सुरक्षा विभागाला दिल्या आहेत.
याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त उदय जरांडे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून हेल्मेट सक्तीबाबत सूचना आल्या होत्या, तसेच महापालिकेचे आयुक्त यांनीही सूचना केल्या आहेत. महापालिकेत आता हेल्मेटविना दुचाकींना प्रवेश दिला जाणार नाही. नियमांना बगल दिल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.