वाकड (Pclive7.com):- दिवंगत युवा उद्योजक प्रशांत उर्फ पिंटू विनोदे यांच्या स्मरणार्थ व स्व. प्रशांत उर्फ पिंटू विनोदे प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि.०१) सलग पाचव्या वर्षी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यंदा तब्बल ५२० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावर्षी रक्तदानास महिला व तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी विविध पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेवक, पंचक्रोशीतील विविध गावांचे सरपंच, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्यासह सामाजिक, उद्योग, व्यापार, व्यवसाय, पोलीस खेळ, कला, क्रीडा, साहित्य, संप्रदाय, शेती अशा विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकाऱ्यांची दिवसभर प्रचंड गर्दी होती.
स्व. प्रशांत विनोदे यांच्यावर प्रेम करणारे आयटीयन्स, वाकड-हिंजवडी पंचक्रोशीतील तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो तरुण दरवर्षी रक्तदान शिबिरात उस्फूर्तपणे सहभागी होऊन आपले सामाजिक कर्तव्य बजावतात. शहरात रक्ताचा तुटवडा झाल्यास हे रक्त गरजू रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी मोलाची मदत करेल. आणीबाणीच्या काळात गरजूंना ह्या रक्तदानातुन जीवनदान मिळावे या हेतूने रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर गरजू व आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत रक्त पुरवले जाणार आहे. यासाठी प्रतिष्ठानसोबत विविध रक्तपेढ्या जोडल्या गेल्याचे संयोजक राहुल विनोदे यांनी सांगितले.
प्रामाणिक आणि नि:स्वार्थी कामामुळे दरवर्षी रक्तदानाचा आकडा उस्फूर्तपणे वाढत आहे. आम्हाला व आमच्या कामाला रक्तदान करून प्रोत्साहन देणाऱ्या तसेच स्वर्गीय प्रशांत विनोदे यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे व प्रतिष्ठानच्या सर्व संयोजक, सदस्यांचेही प्रतिष्ठानच्या वतीने आभार– विक्रम विनोदे, संस्थापक अध्यक्ष.