पिंपरी (Pclive7.com):- महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्यातर्फे (दि.२) हॉटेल रागा पॅलेस या ठिकाणी आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर, महाविकास आघाडीतील घटक पक्षातील मित्र पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.
माजी आमदार ॲड.गौतम चाबुकस्वार म्हणाले आजपर्यंत मी २४ निवडणुका पाहिल्या, परंतु “विधानसभा २०२४” निवडणूक म्हणजे लोकशाहीची हत्या झाली असं म्हणावं लागेल.पोस्टल मतदानामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना लीड आहे. म्हणूनच ईव्हीएम मशीनने आपल्याला हरवले आहे अन्यथा आपण जिंकलो आहोत. जनतेला गुलाम बनवून ठेवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. गुलामीच्या विरोधात लढलेल्या पुरोगामी नेत्यांची नाव घ्यायची आज आम्हाला लाज वाटत आहे. आपण फुले शाहू आंबेडकरांचे विचार अजूनही आत्मसात केलेले नाहीत. लोकशाहीचे चारही स्तंभ नष्ट करण्याचे काम या ठिकाणी चालले आहे.जोपर्यंत बॅलेट पेपर वरती निवडणूक होणार नाहीत तोपर्यंत महाविकासाकडे तर्फे आंदोलन केले जाईल आणि देशाला आदर्श घालून दिला जाईल.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे म्हणाले की, एवढ्या सगळ्या संकटाच्या काळामध्ये इतक्या राजकीय संघर्षांनी घेरलेले असताना आपण विधानसभेसाठी उमेदवार म्हणून समोर आलात त्याबद्दल सर्वांच्या वतीने डॉ. सुलक्षणा शीलवंत यांचे आभार मानतो. पिंपरी मतदारसंघाने धर्मनिरपेक्ष मतांची एकजूट दाखवली, या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांचे आभार मानतो. कोण आपला कोण परका हे समजण्याची संधी या निवडणुकीमध्ये मिळाली. आणि कार्यकर्ते दिवस रात्र एक करून पायाला भिंगरी लावून काम करत होते त्या सर्वांचे आभार मानले. आणि ज्यांना सांगून सांगून देखील त्यांनी काम केलं नाही त्यांना ओळखता आले याबद्दल देखील आभार मानले. सदर निवडणुकीमध्ये मोठ्या धर्मांध शक्तींनी विरोधात काम केले परंतु आम्ही इथून पुढे देखील थांबणार नाही काम करतच राहू असे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले की, भोसरी, चिंचवड, पिंपरी मधील महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार जनतेच्या मनातून पराभूत झालेले नसून ईव्हीएममुळे पराभूत झालेले आहेत. हे आभार मेळाव्यास जमलेल्या मतदारांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे दिसून येत आहे. त्यामुळे जनता महाविकासाकडे सोबत होती आहे आणि उद्याही राहील याचा आम्हाला विश्वास आहे. डॉ. सुलक्षणा या झाशीच्या राणी प्रमाणे लढल्या आहेत. त्या जनतेच्या मनातील आमदार आहेत. तुषार कामठे यांनी काँग्रेस तसेच शिवसेना व इतर मित्र पक्षांचे तसेच प्रत्येक सहभागी घटकाचे आभार मानले.
डॉ. सुलक्षणा शिलवंत आभार मानताना म्हणाल्या की, महाविकास आघाडीमध्ये कोणीही कार्यकर्ते, पदाधिकारी नसून कुटुंबातले सदस्य आहेत. बहात्तर हजार मतदान एकही रुपयात न वाटता मिळवले याचा अभिमान वाटतो. विद्यमान आमदारांनी स्वतःचे मत ही विकत घेतले असेल. राजकीय कारकीर्द सुरू झाल्यापासून पहिल्या पंचवार्षिक मध्येच नगरसेवकापासून ते आमदारकीचे तिकीट मिळवून पक्षाचा विश्वास संपादन करता आला याचा सार्थ अभिमान आहे.
विरोधकांकडे इतका मोठा फौजफाटा असताना देखील एक एक मत त्यांना विकत घ्यावा लागलं. पिंपरी विधानसभेमध्ये प्रत्येकाने मी म्हणजे सुलक्षणा शिलवंत म्हणून काम केले आणि म्हणूनच आपण ७२००० मतांपर्यंत पोहोचू शकलो.
वडिलांच्या शब्दातील पत्र वाचताना डॉ. सुलक्षणा भावूक..
यशाचे भागीदार फार असतात, परंतु अपयशाला वाली नसतो. परंतु आपण सर्वजण सोबत आहात त्यामुळे शिलवंत परिवाराला सदैव आपल्या ऋणात राहायला आवडेल अशा आशयाचे दिवंगत वडिलांचे पत्र वाचताना डॉ. सुलक्षणा भावूक झाल्या होत्या व त्यांना अश्रू अनावर झाले.
यावेळी माजी आमदार ॲड.गौतम चाबुकस्वार,माजी नगरसेवक तुषार कामठे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, दत्ता वाघिरे, विशाल काळभोर, गिरीश कुटे, इमरान शेख, संदीप चव्हाण, धम्मदीप साळवे, गणेश दातीर पाटील आदी उपस्थित होते.