मनपा निवडणुकीच्या तयारीला लागा, आभार मेळाव्यात कलाटे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
वाकड (Pclive7.com):- निवडणुकीत पराभव झाला, पण म्हणून आपण संपलेलो नाही. लाखाहून अधिक मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवला, हजारो कार्यकर्ते दिवसरात्र या निवडणुकी दरम्यान राबले. महाविकास आघाडी म्हणून आपण प्रामाणिकपणे एकत्र काम केले. आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे. भविष्यातील शहराच्या विकासासाठी, जनसामान्यांना न्याय देण्यासाठी आता आपल्याला पूर्ण ताकदीने महापालिका निवडणुक लढायची आहे. त्यासाठी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू, अधिकाधिक नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देऊ, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते राहुल कलाटे यांनी वाकड येथे केले.
विधानसभा निवडणूकीनंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी – कार्यकर्ते – मतदार यांच्यासोबत आयोजित आभार मेळाव्यात कलाटे बोलत होते. यावेळी पृथ्वीराज साठे, संजोग वाघेरे, हरीश नखाते, अरुण पवार, इम्रान शेख, गणेश भोंडवे, नवनाथ जगताप, संपत पवार, विजय काळे, किरण वाडगामा, दत्तात्रय देशमुख, वैशाली मराठे, सागर तापकीर, दिनेश नढे, उल्हास कोकणे, हेमंत डांगे, युवराज वाल्हेकर, साकी गायकवाड, मयुर जैस्वाल, माधव पाटील, नवनाथ तरस, अनिता तुतारे, विश्रांती पाडाळे, सचिन नेटके, बाळासाहेब नढे, संदेश नवले, अनिरुद्ध कांबळे, मकरध्वज यादव, चिंतामण सोंडकर, माऊली मलशेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवडणुकीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी एकजुटीने दिलेला लढा कौतुकास्पद आहे. आगामी काळात महापालिका निवडणूकीत याच ताकदीने, एकजुटीने काम करु. लोकहितासाठी नेटाने काम केल्यास या महापालिकेत सर्व तरुण चेहरे दिसतील. इथल्या आमदारांचा जीव महापालिकेत आहे आणि हीच महापालिका त्यांना आपण मिळू द्यायची नाही. त्यांचे मनसुबे धुळीत मिळविण्यात यशस्वी होऊ, असा निर्धार कलाटे यांनी व्यक्त केला.
देशातील लोकशाही जिवंत ठेवायची असेल, पुढच्या पिढीचे भवितव्य सुरक्षित करायचे असेल तर चुकीच्या प्रवृत्तींविरोधात लढा उभारावा लागेल. विधानसभेला लाडकी बहीण, ‘कटेंगे तो बटेंगे’ असे नरेटिव्ह तयार करून सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करण्यात आली. शहराच्या मूलभूत प्रश्नापासून लक्ष हटवून वेगळ्याच मुद्द्यांवर ही निवडणूक झाली. या सर्व वाईट प्रवृत्तींविरोधात लढा उभारावा लागेल. शहरातील बिघडलेली व्यवस्था सुधारण्यासाठी चांगल्या विचारांची तरुण पिढी पुढे आणावी लागेल. तसा प्रयत्न महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणूकीतही केला होता. मात्र, ईव्हीएमने घोटाळा केला, असेही कलाटे म्हणाले. पोस्टल मतात महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार पुढे होते तरीही निवडणुकीचा निकाल मात्र पूर्णपणे एकतर्फी विरोधात आहे. त्यामुळे फेरमतमोजणी घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ईव्हीएम विरोधात प्रखर लढा द्यायचा याबाबतही मेळाव्यात एकमत झाले.
दिल्लीची हुकूमशाही आता महाराष्ट्रातही..
संविधान दिनी राष्ट्रपती, पंतप्रधान व विरोधी पक्षनेते यांनी लोकसभेच्या सभागृहात बोलण्याची परंपरा आपल्या देशात होती. त्यानुसार सर्वांना बोलू द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षाने सध्याच्या सरकारकडे केली मात्र ती मागणी धुडकावून लावण्यात आली. अशी माहिती खुद्द शरद पवार साहेबांनी आम्हाला दिली. अशीच हुकूमशाहीवृत्ती दिल्लीतुन मुंबईपर्यंत आणि आता संपुर्ण महाराष्ट्रात देखील आली आहे. चिंचवडमध्येही यापूर्वीच उदघाटन झालेल्या प्रकल्पांचे पुन्हा उदघाटन अजून शपथविधीही झालेला नसतांना विद्यमान आमदारांनी केले, अशी खोचक टीका कलाटे यांनी केली.
Tags: rahul kalate