आळंदी (Pclive7.com):- आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीत असलेल्या चऱ्होली येथील काळे कॉलनीमध्ये विद्युत खांब उभारण्यात यावा अशी मागणी सचिन काळे युवा मंचच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आळंदी नगरपरिषदेच्या विद्युत विभागाचे अभियंते विष्णूकुमार शिवशरण यांच्याकडे लेखी निवेदन देऊन विद्युत खांब उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, काळे कॉलनी येथे गेल्या १० वर्षापासून काही भागातील रस्त्यावर विद्युत खांब नसल्याने रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य असते. रात्री रस्त्यावर लाईट नसल्यामुळे महिलांना रस्त्यावर ये -जा करता येत नाही. अनेक विद्यार्थीनी संध्याकाळी शिकवणीसाठी घराबाहेर ये- जा करत असतात. या अंधाराचा फायदा घेऊन काही टवाळखोर त्या ठिकाणी विद्यार्थिनींची छेडछाड काढण्याच्या घटनाही घडत आहेत.
वारंवार नगर परिषदेच्या विद्युत विभागाच्या अभियांत्यांना तोंडी तक्रार दिली आहे. पण ते गांभीर्याने घेत नाहीत. परंतु या ठिकाणी महिला व विद्यार्थिनींबाबतीत एखादी घटना घडल्यानंतर नगरपरिषदेला जाग येणार आहे का? त्यामुळे तातडीने या ठिकाणी विद्युत खांब उभारून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सचिन काळे युवा मंचच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक अँड सचिन काळे, युवा नेते मंगेश काळे उपस्थित होते.